|| विकास महाडिक

करोनामुळे आवक ठप्प

नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्यावरील संकट करोनामुळे अधिक गडद झाले आहे. परतीचा पाऊसाने घातलेल्या धुमाकूळामुळे यंदा हापूस आंब्याची मोहर आणि पर्यायी फळधारणा उशिरा झाल्याने उत्पादन ४० टक्याने घटले आहे. त्यात करोनामुळे नवे संकट निर्माण झाले असून हापूस आंब्याच्या आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे आंबा बागयतदार चिंतेत आहेत.

पावसाळा सरल्यानंतर एक दोन महिन्यात कोकणातील हापूस आंब्याच्या झाडांना मोहर धरण्यास सुरुवात होते. त्यामुळे काही व्यापारी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या फळांची चांगली जोपासना करुन तो जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून बाजारात पाठविण्याचा प्रयत्न करतात. यंदा मात्र बागायतदारांचे हे गणित कोलमडल्याचे ऑक्टोंबर महिन्यातच दिसून आले. या महिन्यात कोकणात परतीच्या पावसाने झाडावर दिसणारा मोहर गळून पडला. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ही मोहराची ही दैनावस्था झाल्यावर डिसेंबरच्या थंडीत होणाऱ्या फळधारणेवर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला.  मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून तुर्भे येथील फळांच्या घाऊक बाजारात सात ते आठ हजार पेटय़ा कोकणातून येण्यास सुरुवात झाली होती. गुढीपाडव्याच्या मुर्हतावर ही आवक वाढणार असल्याची खात्री व्यापारीवर्गाला होती. मात्र करोनाचा कहर वाढू लागल्याने २१ दिवसांच्या टाळेबंदीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांना आंबा बागेलाही टाळा ठोकण्याची वेळ आली आहे. सध्या कोकणातून तीस ते पस्तीस हजार हापूस आंब्याच्या पेटय़ा मुंबईत येण्यास तयार असल्याचे समजते. मात्र बाजारात विक्रीची व्यवस्था नसल्याने त्यांच्यावर हे नवे संकट उभे राहिले आहे.कोकणातून हापूस आबां या टाळेबंदीच्या काळात पाठविला नाही तर त्याने काहीही बिघडणार नाही असाही एक मतप्रवाह आहे.

आंबा विक्रीची व्यवस्था व्हावी

कोकणात सुमारे चार लाख एकर जमिनीवर हापूस आंब्याची लागवड केली जाते. काही कोकणस्थ बागायतदारांचे हे एकमेव हुकमी पीक आहे. याच आंब्याच्या विक्रीवर या बागायतदारांचा वर्षांचा उदहनिर्वाह चालत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या उत्पन्नावर कोकणातील बागायतदारांचे विशेष लक्ष आहे. मात्र करोनामुळे हे गणित बिघडले आहे. चांद्यापासून बांध्यापर्यंत विकला जाणारा या फळांची वार्षिक आर्थिक उलाढाल दोन हजार कोटींच्या घरात असून हा आंबा वेळीच मुंबईत विकण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी कोकण भूमी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केली आहे. त्यासाठी मनुष्यबळ पुरविण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

हापूस आंब्याचे गणित यंदा पूर्णपणे फिस्कटले आहे. त्यामुळे आंबा लवकर काढून तो व्यापाऱ्यांकडे पाठविण्याची बागायतदारंची इच्छा आहे पण तो मुंबईत आणून विकायचा कसा असा प्रश्न आहे.

-संजय पानसरे, संचालक, फळ बाजार, एपीएमसी