इमारतींवरील पत्रे उडाल्याने वाहनांचे नुकसान * नेरुळ, सीवूड्स, बेलापूरसह खारघर, कळंबोलीत २०० वृक्ष जमीनदोस्त * डी. वाय. पाटील स्टेडियमवरील वजनदार छत कोसळले

नवी मुंबई : जूनमध्ये ‘निसर्ग’ वादळात झालेल्या हानीची पुनरावृत्ती बुधवारी नवी मुंबईत पाहायला मिळाली. दुपारी वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी सुमारे २०० झाडे कोसळली. तर अनेक ठिकाणी इमारती आणि घरांवरील पत्रे उडून गेले. वादळात वृक्ष विद्युत तारांवर उन्मळून पडल्याने नवी मुंबई, पनवेल आणि उरण मध्ये ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. करोना संसर्गामुळे घरी असलेल्या नागरिकांना  सावधगिरीचा उपाय म्हणून घरीच राहण्याच्या सूचना पालिकांनी दिल्या आहेत. सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीत ११५.७८ मिमी. पाऊस झाला.

बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. दुपारी पावसाचा जोर वाढला. सोसाटय़ाचा वाऱ्यासह सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर नागरिकांची दाणादाण उडाली. पावसामुळे दुचाकीस्वारांना वाहने वाटेतच थांबवून आडोसा शोधावा लागला. तर काहींना दुचाकी चालवणे अशक्य झाले होते. पावसाच्या माऱ्यापासून इमारतीचे नुकसान होऊ नये, यासाठी लोखंडी सांगाडय़ावर उभारण्यात आलेले पत्रे जोरदार वाऱ्याने उडून गेले. काही ठिकाणी पत्रे रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर जाऊन पडले. यात काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान झाले.

नेरुळ-उरण फाटय़ाहून जाणाऱ्या मार्गावरही झाडे कोसळली. शहरातील अंतर्गत एका रस्त्यावर पाच झाडे कोसळल्याची घटना घडली.  नेरुळ, सीवूड्स आणि बेलापूर परिसराला  वादळाचा जोरदार तडाखा बसला. नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, तसेच पाटील स्टेडियमवरचे छतही कोसळले.

पालिका मुख्यालयातील पत्रे उडाले

नवी मुंबई महापालिका मुख्यालयातही वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विद्युत जनित्रची व्यवस्था करण्यात आली. मात्र, विद्युत जनित्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणचे पत्रे वाऱ्याने उडाल्याने मुख्यालयातील काही विभागांतील  वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

२०० झाडे जमीनदोस्त

नेरुळ, सीवूड्स, बेलापूर आणि वाशी या परिमंडल क्षेत्रात सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे २०० हून अधिक झाडे पडली. मात्र, पालिकेकडे २५ झाडेच पडल्याची नोंद होती अग्निशमन विभागाकडून माहिती आल्यानंतर संख्या प्राप्त होईल, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

इंटरनेट सेवा विस्कळीत

बुधवारी दुपारनंतर नवी मुंबई, पनवेल आणि उरणध्ये वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात केबल आणि इंटरनेट सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली. जूनच्या पहिल्याच आठवडय़ात ‘निसर्ग’ चक्रीवादळात झालेले नुकसान भरून निघत नाही, तोच मुसळधार पावसामुळे काही किलोमीटर अंतरावर टाकण्यात आलेल्या केबल जागोजाती तुटल्या. वादळाचा सर्वात मोठा तडाखा नेरुळ भागाला बसला.  उलवे येथे इंटरनेटची केबल तुटल्याच्या घटना घडल्या. इंटरनेट सेवा पूर्ववत होण्यास किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती ‘डेन-अरॉन’चे संचालक संजीव गुप्ता यांनी दिली.