डॉ. संजीव म्हात्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आरं आयलार पैलारचे बाया-बापऱ्यांनो, पोरा-बालांनो उंद्या आनसवं (पहाटे) चरी गावाचे येशीवं जमाचा हाय रंऽऽऽ’ अशी दवंडी मढव्याकरवी कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील प्रत्येक आगरी गावात घुमू लागली. ही वादळाची पूर्वसूचना होती. आगरी समाजातील शेतकरी ब्रिटिश सरकारविरोधात एकवटत होता, कारण शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. तो लढा होता ‘चरीच्या शेतकरी संपाचा’.

कष्टाला आमी भित नाय,

हारामाचा आमी खात नाय,

मं हातातोंडाशी आलेला घास,

माजे पोटान कसा जात नाय.

काली आई परली रं गहान,

मिठागरान खोत घाली रं थैमान,

वेठ करून झालू रं हैरान,

देवा, कदी सुटल रं यो गिरान.

ब्रिटिशांची दडपशाही सुरू होती. खोत शेतकऱ्यांचा अतोनात छळ करत होते. सरकारच्या बरोबर स्वत:ची तिजोरी भरून शेतकऱ्यांत दहशत निर्माण केली होती. पिकवलेल्या धान्यातील ७५ टक्के हिस्सा खोत घेत असे व उरलेल्या धान्यात कुटुंबाची गुजरण करणे आगरी शेतकऱ्याला सोसेना. वेठबिगार म्हणून कसल्याही मोबदल्याशिवाय खोत वा सावकाराकडे पडतील ते कष्ट करावे लागत. शिवरायांच्या सेना दलात, सरखेल कान्होजी आंग्य्रांच्या आरमारात पराक्रम गाजवणारे मूळनिवासी आगरी अन्नाला मोताद झाले होते. ब्रिटिशनितीने त्यांना खोत व सावकारांना शरण जावे लागले होते. टीचभर पोटाने गर्वाने भारलेले देह आणि स्वाभिमानाने उंचावलेल्या माना सत्तेपुढे झुकायला लावल्या होत्या.

अशा स्थितीत आशेचा किरण तळपत यावा तसा शेतकऱ्यांचा वाली उदयास आला – नारायण नागू पाटील. अलिबागमधील या आगरी समाजाच्या नेतृत्वाला या जुलमांनी अस्वस्थ केलं होतं. त्यांनी आपल्या बांधवांना खोतांविरुद्ध अर्थात ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं. बंडाचं रणशिंग फुंकलं. कुलाबा जिल्ह्यातील गावोगावी जाऊन अवघा आगरी समाज एकत्र आणला. सरकारने या प्रवाहाला आडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. ना. ना. पाटील यांना खंबीर साथ होती अनंतराव चित्रे यांची आणि समस्त आगरी समाजाचं बळ होतं.

२७ आक्टोबर १९३३ला चरी या अलिबाग तालुक्यातील गावी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची शेतकरी परिषद घेण्याचा निर्णय झाला. याआधी झालेले असे प्रयत्न चिरडले गेले होते. सरकार व खोतही गाफील होते. ठरल्याप्रमाणे शेतकरी अवजारे, खरोल, कोयता, कुदळ घेऊन चरी गावी जमू लागले. अफाट जनसमुदाय जमल्यामुळे नेत्यांनाही हुरूप आला होता. शेतकऱ्यांनी पिकवायचं आणि खोत व सावकारांनी गिळायचं याला एकच उपाय ‘संप!’ ‘शेतीचा संप!’ शेतच पिकवायची नाहीत. कुलाबा जिल्ह्यात नव्हे संपूर्ण भारतात पहिल्यांदाच असा शेतकरी संप होणार होता. संपाचा नारा होता ‘खोतशाही नष्ट करा, सावकारशाही नष्ट करा.’ वर्ष उलटले, दुसरे वर्ष सुरू झाले. उपासमार सुरू झाली. शहरातील धनदांडग्यांकडे धुणीभांडी करणे भाग पडले. परंतु सरकार शेतकऱ्यांनाच धमकावत होते. नेत्यांविरोधात कटकारस्थान रचत होते.

डॉ. आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलं. भाई ना. ना. पाटील व भाई अनंतराव चित्रे, शामराव परुळेकर, सुरेंद्र टिपणीस असे दिग्गज या कामी लागले. १९३४ ला डॉ. आंबेडकर चरी या गावी दाखल झाले. त्यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत झाले. गगनभेदी घोषणा दिल्या गेल्या. इथेच बाबासाहेबांनी ‘स्वतंत्र मजूर पक्षाची’ घोषणा केली. ना. ना. पाटीलांनी शेतकरी कामगार पक्षाची पायाभरणी केली. दडपशाहीविरुद्ध स्वतंत्र कायदा करण्याचा वायदा त्यांनी केला.

१९३९ साल उजाडलं. तरीही संपावर तोडगा निघेना. आता खोतांवरही उपासमारीची वेळ आली. सावकारही नरमले. आगरी समाजाने न डगमगता, सर्व संकटांवर मात केली. सलग सात वर्षे संघर्ष सुरू ठेवला ही भारतातील नव्हे तर जगातील एकमेव घटना होती. अखेर या लढय़ाला यश आलं. ‘राहील त्याचं घर व कसेल त्याची जमीन’ अंतर्गत शेतकरी राजा झाला. याचं संपूर्ण श्रेय चरी शेतकरी संपाला जातं.

कसेल त्याची जमीन

स्वातंत्र्याच्या उंबरठय़ावर असलेल्या भारतात मुंबई कौन्सिलमध्ये बाळासाहेब खेर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं प्रस्थ वाढत होतं. कौन्सिलमध्ये आत्ता बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १४ आमदार होते. सात वर्षे सुरू असलेल्या चरीच्या शेतकरी संपाचे पडसाद कौन्सिलमध्ये उमटू लागले. मंत्रिमंडळातील महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरी येथे जाऊन या संपात मध्यस्ती करण्याच्या सूचना दिल्या. १९३९ला स्वत: मोरारजी देसाई चरी येथे दाखल झाले व त्यांनी शेतकरी व सावकारांच्या प्रतिनीधींशी सविस्तर चर्चा केली. सात वर्षे आगरी समाजाला धीर देणारे ना. ना. पाटील यांनी हा प्रश्न लवादामार्फत सोडवावा, अशी विनंती मोरारजी देसाईंना केली व त्यांनी ती तात्काळ मान्य केली. मोरारजी देसाईंच्या मध्यस्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विधेयकामुळे दीर्घकाळ चाललेला हा ऐतिहासिक चरीचा शेतकरी संप मिटला. आगरी समाजातील या शेतकऱ्यांनी अहिंसेच्या मार्गाने सात वर्षे सुरू ठेवलेल्या या संपामुळे पुढे कायदा संमत होऊन संपूर्ण भारत देशात ‘राहील त्याचं घर व कसेल त्याची जमीन’ अंतर्गत शेतकरी राजा झाला. याचं संपूर्ण श्रेय चरी शेतकरी संपाला जातं. इतिहासाने शेतकऱ्याला जगवलं; परंतु इतिहासकारांनी या ऐतिहासिक लढय़ाला मात्र अंधारातच ठेवलं.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Historical farmers strike
First published on: 08-09-2018 at 04:20 IST