बेकायदेशीर बांधकामांच्या जीवघेण्या स्पर्धेत गावातील मोकळ्या जागा गिळंकृत करण्यात आल्याने आता प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर होळी पेटवण्याची वेळ आली आहे. कोकणाप्रमाणे ठाणे जिल्ह्य़ातील या आगरी-कोळी पंचक्रोशीत होळी उत्सवाची एक वेगळी पद्धत होती, पण ती कालबाह्य़ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे आता नागरीकरणाच्या काळात केवळ सोपस्कार म्हणून होळी पेटवण्याची परंपरा पार पाडली जात आहे. चाळीस वर्षांपूर्वी सिडकोने नवी मुंबई हे शहर वसविण्यास सुरुवात केली, मात्र नव्वदच्या दशकापर्यंत नवी मुंबईतील गावाजवळील विस्र्तीण मोकळ्या जागा नजरेस पडत होत्या. त्यामुळे कोकणाप्रमाणे तेव्हाच्या बेलापूर पट्टीत होलिकोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जात होता. त्यासाठी सुकी-ओली लाकडे, विधिवत पूजाअर्चा आणि होलिका देवीची गाणी, त्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागरण, शिंगोल्याच्या (नारळाच्या) करंज्या, तांदळाच्या पापडय़ा, पुरणपोळ्या या होलिकामातेला नैवेद्य म्हणून ठेवल्या जात होत्या. हा नैवेद्य ठेवल्यानंतर तो पळविण्यासाठी गावातील टारगट मुलांच्या टोळ्या या होळी माळरानावर रात्रभर पहारा देत होत्या. मोकळ्या जागा, माळरान असल्याने या सणाचा एक वेगळा आनंद साजरा केला जात होता, पण बेकायदेशीर बांधकामांचा भस्मासुर उभा करण्याच्या नादात या मोकळ्या जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्या असून आता गावात पाय ठेवायला मोकळी जागा नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी आमची होळी पेटायची, इतक्याच आठवणी ग्रामस्थांजवळ राहिल्या असून होळीच्या जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. ही स्थिती नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात सर्वत्र सारखीच असून पनवेल-उरण भागात हे प्रमाण कमी आहे, पण येत्या काळात येथील मोकळ्या जमिनीदेखील इतिहास होणार आहेत असे चित्र आहे. त्यामुळे होळी पेटवायलापण जागा शिल्लक न राहिल्याने आता ग्रामस्थ घरासमोरील रस्त्यावर होळी पेटवत असल्याचे केविलवाणे दृश्य बुधवारी पाहण्यास मिळणार आहे.