राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे पुनर्बाधणीसाठी उपोषण; विरोधकांची टीका

सीवूड्स सेक्टर ४८ येथील सिडकोच्या साईसंगम सोसायटीतील प्लास्टर कोसळलेल्या घराची दुरुस्ती सुरू झाली आहे. सिडकोने गेल्या सहा महिन्यांपासून घरांची डागडुजी बंद केली होती. यासंदर्भात विविध राजकीय पक्षांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याकडे दाद मागितल्यानंतर घर दुरुस्ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

साईसंगम सोसायटीत समीर नारकर यांच्या घराच्या छताचे प्लास्टर १६ ऑगस्टला कोसळले, त्यात दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर शिवसेना, भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी लोकेश चंद्रा आणि सिडकोचे मुख्य अभियंता वरखेडकर यांची भेट घेतली होती आणि सिडकोच्या घरात पडझड झाल्यास दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता डागडुजी सुरू झाल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू लागला आहे.

घराची डागडुजी सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांनी गुरुवारी या प्रश्नी उपोषण सुरू केले. घरांची पुनर्बाधणी करावी, पाण्याच्या टाक्या सिडकोनेच दुरुस्त कराव्यात, दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, इत्यादी मागण्यांसाठी डोळस यांनी बेलापूर येथील अर्बन हाटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे, मात्र हे उपोषण म्हणजे केवळ श्रेयासाठीची स्टंटबाजी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

घराचे प्लास्टर कोसळल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला जाग आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढय़ा वर्षांत हा प्रश्न का सोडवला नाही? उपोषण करण्याऐवजी कामे करावीत, अशी टीका भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

‘सिडकोने निकृष्ट घरे बांधली आहेत. त्यामुळे सातत्याने दुर्घटना घडत आहेत. सिडकोनेच आमच्या घरांची पुनर्बाधणी करून द्यावी, अशी मागणी सिडकोच्या शिवदर्शन सोसायटीतील रहिवासी दिलीप कांबळे यांनी केली.

सिडकोविरोधात उपोषण करणार असल्याचे पत्र सिडकोला आधीच दिले होते. दुर्घटना घडण्यापूर्वीही संजीव नाईक यांच्यासमवेत सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेतली होती. विविध मागण्यांसंदर्भात सिडकोच्या अभियंत्यांशी गुरुवारी बैठक झाली. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही.

– विशाल डोळस, नगरसेवक राष्ट्रवादी

राष्ट्रवादीचे नगरसेवक आता उपोषणाला बसले आहेत, पण नवी मुंबईत अनेक वर्षे राष्ट्रवादीचीच सत्ता होती. अनेक वर्षे सिडकोचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच होते. एवढय़ा वर्षांत राष्ट्रवादीने हा प्रश्न का सोडवला नाही. हे उपोषण म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे.

– विशाल विचारे, शाखाप्रमुख, सीवूड्स