करोनाकाळात तपासणीच केली जात नसल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा

नवी मुंबई : करोनाचा संसर्ग झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली. परंतु, नवी मुंबईत ज्यांचं घरच नाही, अशा भिकारी लोकांचं काय, हा प्रश्न कधी पालिका प्रशासनाला पडला नाही. करोना काळातील मार्च ते मे अखेर पर्यंतचा साधारण ७२ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही या बेघरांची तपासणी अद्याप करण्यात आलेली नाही वा या गटातील कोणी बाधित झाल्याची माहिती पालिका दफ्तरी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरात सुमारे दोन ते अडीच हजार जण भीक मागून निर्वाह करतात. यातील काही जण सिग्नलवर फुले, चित्रकलेचे पुस्तके, खेळणी विकून पोट भरतात.

सध्या काही जण मुखपट्टय़ाही विकण्यात आघाडीवर आहेत. अशा गटांतील व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. तर बेघरांमधील एकाचीही तपासणी अथवा त्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरात ७५ हून अधिक तृतीयपंथीय राहतात. बहुतेक जण कोपरी गावातील देवीच्या मंदिरात राहतात.

सिग्नलवर त्यांच्यापैकी एकाचीही अद्याप तपासणी झालेली नसल्याकडे माजी नगरसेवक उषा भोईर यांनी लक्ष वेधले. रस्त्यावर वा उघडय़ावर राहणाऱ्या लोकांची तपासणी करण्यात आलेली नाही. अर्थात हे लोक रुग्णालयात जाऊन उपचार घेत नाहीत.

त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन त्यांची माहिती गोळा करणे आवश्यक आहे. त्यांच्या या काळात तपासण्या झाल्यास काही तरी माहिती लागू शकेल, असे मत रुग्णमित्र प्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले.

भिकारी वा बेघरांमध्ये लागण झाल्याची माहिती अद्याप आरोग्य विभागाकडे आलेली नाही. मात्र, कोणत्याही साथीच्या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती असणे आणि कळत-नकळत सामाजिक अंतर त्यांच्यात पाळले जात असावे, अशी शक्यता आहे.

-संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त पालिका