28 October 2020

News Flash

बेकायदा कोविड रुग्णालये

नवी मुंबईत केवळ ४० रुग्णालयांना कोविडचा दर्जा देण्यात आला आहे

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका प्रशासनाचे शहरातील खासगी रुग्णालये व औषध दुकानांकडून सुरू असलेल्या आर्थिक लुटीकडे दुर्लक्ष होत आहे. यात आणखी एका बेकायदेशीर आरोग्य सेवेची भर पडली असून नवी मुंबईत अनेक छोटय़ा मोठय़ा रुग्णालयांनी पालिकेची परवानगी नसताना कोविड रुग्णालये सुरू केली आहेत. नवी मुंबई काँग्रेसने या बेकायदेशीर कोविड रुग्णालयांच्या या आर्थिक शोषणाविरोधात आवाज उठविला आहे. नवी मुंबईत केवळ ४० रुग्णालयांना कोविडचा दर्जा देण्यात आला आहे, मात्र दोनशेपर्यंत खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत.

कोविड साथ रोगाच्या नावाने काही डॉक्टर आणि रुग्णालयांनी आपली उखळ पांढरी करून घेण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळेच नवी मुंबईत करोना रुग्णांकडून जादा आकारण्यात आलेले ३२ लाख रुपये खासगी रुग्णालयांना परत करण्याची नामुष्की सहन करावी लागली. ‘मनसे’ने या विरोधात आवाज उठविला होता. खासगी रुग्णालयांनी आकारलेले जादाचे देयक कमी न केल्यास आयुक्तांना खासगी रुग्णालयांचे तारणहार असा पुरस्कार देणार असल्याचे नवी मुंबई मनसे प्रमुख गजानन काळे यांनी जाहीर केले होते. त्यामुळे पालिकेच्या लेखापरीक्षण समितीने दहा रुग्णालयांना ३२ लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले. यामुळे खासगी रुग्णालये कोविड उपचाराच्या नावाने रुग्णांकडून जास्त देयके आकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाच प्रकार औषध दुकानांतही सुरू आहे. थर्मल गन, ऑक्सिमीटर यांच्या किमती दामदुपटीने वसूल केल्या जात आहेत.

हे प्रकार सुरू असताना आता परवानगी नसताना करोनावर खासगी उपचार करण्यात येत आहेत. नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी वाशी सेक्टर २८ येथील पामबीच मार्गावरील पामबीच हॉस्पिटल या रुग्णालयाला कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी नसताना त्या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे आढळून आले आहे. कोविड रुग्णांवर उपचार करताना आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णालयाची रचना व वैद्यकीय सेवेची आवश्यकता नमूद करण्यात आली आहे. सावंत यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त बांगर यांच्याकडे अशा प्रकारच्या शहरातील अनेक रुग्णालयाची तक्रार केली. त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले.

चार खासगी रुग्णालयांना परवानगीस नकार

नवी मुंबई : शहरातील चार खासगी रुग्णालयांनी पालिकेकडे करोना रुग्णालयासाठी परवानगी मागितली आहे; परंतु पालिकेने इतर आजारांच्या रुग्णांसाठी उपचार सुविधा मिळाव्यात यासाठी या रुग्णालयांना परवानगी नाकारली आहे.

शहरातील १४ रुग्णालयांत पालिकेने करोना रुग्णांसाठी सेवा सुरू केल्या आहेत. वाशी येथील पालिका रुग्णालय, तेरणा, फोर्टिस, रिलायन्स, एमजीएम बेलापूर, न्यूरोजन सीवूडस, एमपीसीटी सानपाडा, अपोलो, पीकेसी वाशी, इंद्रावती ऐरोली, डॉ. डी.वाय. पाटील नेरुळ, राजपाल तसेच सिद्धिका रुग्णालय कोपरखैरणे व एमजीएम

वाशी या  चौदा रुग्णालयांचा समावेश आहे. असे असतानाही अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेली सेवा कमी पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार होत असल्याने आणखी खासगी रुग्णालयांना करोनासाठी परवाणगी देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांचे आणखी हाल होतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 12:45 am

Web Title: illegal covid hospitals in navi mumbai zws 70
Next Stories
1 पोलीस दलातील करोनाचा नववा बळी
2 वाशी पालिका रुग्णालयात इतर आजारांसाठी ९० खाटा
3 पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान
Just Now!
X