नेरुळमधील भूखंडावर अतिक्रमण; सिडको, पालिकेचे दुर्लक्ष

कोपरखैरणे येथील सिडकोच्या भूखंडावरील कारवाई दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर सिडकोच्या अन्य भूखंडांवरील अतिक्रमणांचा प्रश्नही गंभीर झाला आहे. नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या मोक्याच्या भूखंडावरील गवत व झुडपे जाळून गेल्या दोन दिवसांत तिथे सुमारे २०० झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. मजुरीसाठी नांदेडहून आलेल्यांनी या झोपडय़ा उभारल्या आहेत.

अतिक्रमणे हटविल्यानंतरही पुन्हा पुन्हा अतिक्रमण होत असल्याने हे भूखंड स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवून विकण्याचा निर्णय सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी घेतला होता. त्यानंतर दोन टप्प्यांत ही प्रक्रिया राबवली गेली. पहिल्या टप्प्यात सहा तर दुसऱ्या टप्प्यात १३ भूखंड अतिक्रमणमुक्त करून विकण्यात आले. त्यामुळे सिडकोच्या महसुलात मोठी भर पडली. परंतु एकीकडे काही भूखंड अतिक्रमणमुक्त केले जात असताना अनेक मोक्याच्या भूखंडावर अद्यापही अतिक्रमण कायम आहे.

नेरुळ जिमखान्यासमोरचा सेक्टर ३० मधील ८ ई व त्याच्या आजुबाजूच्या भूखंडांवर दोन दिवसांत अनेक झोपडय़ा बांधण्यात आल्या आहेत. सीवूड्स पश्चिमेला सेक्टर ४०मधील भूखंड क्रमांक २२, २३, सेक्टर ४८ ए येथील भूखंड, नेरुळ सेक्टर २८ व सेक्टर ५० मध्ये मोकळ्या भूखंडांवर राजरोस अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच नेरुळ सेक्टर ३० येथील नेरुळ जिमखान्यासमोरच्या अनेक भूखंडांवर झोपडय़ा वसल्या असताना तिकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे.

नेरुळ जिमखान्यासमोरच्या झोपडपट्टीबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. याच झोपडपट्टीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. अनेक भूखंडांना कचराकुंडीची अवकळा आली आहे. पावासाळ्यात रोगराई पसरण्याची भीती आहे.

समीर बागवान, परिवहन सदस्य

सिडकोचा अतिक्रमण विभाग नियोजनानुसार कारवाई करतो. नेरुळ जिमखान्यासमोर असलेल्या भूखंडावर सिडकोने यापूर्वी कारवाई केली आहे. येथे पुन्हा झोपडय़ा निर्माण झाल्या आहेत. त्यावरही कारवाई करण्यात येईल.

पी. आर. राजपूत, साहाय्यक अतिक्रमण नियंत्रक अधिकारी, सिडको