उरण-पनवेल परिसरातील रस्त्यावर धावणाऱ्या अवजड वाहनांच्या पर्यायी वाहतुकीसाठी सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी गुरुवारपासून (ता. २६) उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यासाठी संस्थेने गावोगावी जाऊन ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या आहेत.

उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या नेतृत्वात संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

या उपोषणाला उरणचे आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी दिली. जेएनपीटी व येथील दोन खाजगी बंदरातील कंटेनर हाताळणीची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने २०१० पासून रस्त्यावरील अपघातात वाढ झाली आहे.

हे अपघात रोखण्यासाठी करळ ते गव्हाणफाटा दरम्यान तात्पुरती स्वतंत्र मार्गिका तयार करावी, वाहतूक कोंडी करणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहनांसाठी वाहनतळ तयार करून बेकायदा वाहने चालविणारे व रस्त्यावर उभे करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

रस्त्यावर पथदिवे लावून अपघात प्रवण क्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात यावेत.अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी जेएनपीटी रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर आणि अपघातग्रस्त कक्ष तयार करावा. आदी मागण्या या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.