भिंत ओलसर झाल्याने धोका

दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार करून स्थलांतरित झालेले पोस्ट कार्यालय पनवेलमध्येच मे महिन्यात सुरू केले. मात्र आज या कार्यालयाला गळती लागली आहे. दोन गाळ्यांमध्ये सुरू केलेल्या या कार्यालयातील एक भिंत ओलसर झाल्याने विजेचे झटके लागतील का? अशी भीती कर्मचारी व येथे येणाऱ्या नागरिकांना आहे. शौचालय आहे, मात्र त्याला दरवाजा नाही. एक प्लायवूडचा तुकडा लावला आहे.

शहरातील शिवाजी चौकात पालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हे पोस्ट कार्यालय आहे. हलक्या दर्जाच्या वीजवाहिन्या गाळ्यात असल्याने ‘शॉर्टसर्कीट’ होण्याची भीती आहे. विशेष म्हणजे पालिकेने बांधलेल्या या गाळ्यामध्ये अग्निशमन वाहिनीची उपाययोजना केली नसल्याचे उजेडात आले आहे. नवीन बांधकाम करणाऱ्या इमारतींना पालिका अग्निशमन यंत्रणेची वाहिनी अनिवार्य आहे. मात्र या इमारतीची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

पोस्ट कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही सर्व समस्या मांडली. यासाठी पोस्ट विभागाने पालिकेला पत्रही पाठविले आहे. मात्र अद्याप त्यावर कोणतीही उपाययोजना झालेली नाही. पोस्ट विभागाला पालिकेने भाडय़ाने ११०, १११ हे गाळे दिले असून पालिकेने भाडेकरूंना वीज व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था आणि शौचालय तसेच भिंतीना रंगरंगोटी करून हे गाळे हस्तांतरण करणे अपेक्षित होते. मात्र पनवेल पोस्ट कार्यालयात गेल्यावर पालिकेने दुजाभाव केल्याचे दिसत आहे.  पोस्ट कार्यालयाची तक्रार आली असून लवकरच याबद्दल कार्यवाही केली जाईल,असे पनवेल पालिकेचे  शहर अभियंता सुनील कटेकर यांनी सांगितले.