पनवेलमध्ये इंटरनेट पुरविणाऱ्यांची व्यावसायीक स्पर्धा सध्या लागली असून या स्पर्धेत सामान्य नेटीझन्सचा लाभ होताना दिसत आहे. एका नामांकित कंपनीने ५ एमबीपीएस वेगाने चालणारी सेवा अवघ्या ४०० रूपयांत दिली आहे. प्रत्येक इमारतीवर सत्ता कोणाची आणि इमारतीमधील सदनिकांमध्ये कोणाचे केबलनेट घेतले जाईल याची उत्सुकता या व्यावसायींकाना लागली आहे.
कळंबोली, कामोठे, खारघर, पनवेल शहर व नवीन पनवेल आणि कोपरखैरणेपासून ते वाशी पर्यंत ही नेट व्यावसायीकांची स्पर्धा रंगली आहे. १ एमबीपीएस नेटचा वेग ४०० रूपये महिना शुल्कात मिळेल असा दर सध्या सुरू आहे. मात्र एका नामांकित कंपनीने (लीओ नेट) ३५० रूपये महिन्याला भरा आणि ५ एमबीपीएस या वेगाने इंटरनेट वापरा ही योजना बाजारात आणली आहे. सोबत या कंपनीने स्थापत्य शुल्कावर पाणी सोडले आहे. त्यामुळे या कंपनीकडे अनेक ग्राहक आकर्षित होत आहे. उन्हाळ्यामुळे घरबसल्या इंटरनेट वापराची संधी या नेट व्यावसायीकांच्या स्पर्धेमुळे नवी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. सध्या बाजारात लीओ नेट, एसएसव्ही, डेन नेट, आशिष नेट, सीमरन, डब्ल्यू नेट, कोकोनेट व इतर कंपन्या सेवा पुरवत आहेत. नवी मुंबईत यापुर्वी केबल नेटवर्क या व्यावसायिकांची अशीच स्पर्धा झाली होती. यात नेरूळमधील व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार करण्यात आल्यानंतर दरातील चढाओढीच्या स्पर्धेला पुर्णविराम मिळाला. काही वर्षांनंतर टाटास्काय, डीशटिव्ही असे पर्याय उपलब्ध झाले. जुने केबलनेट चालविणाऱ्या व्यावसायिकांनी लक्ष्य इंटरनेट पुरवठय़ाकडे वळविल्याने हा व्यापारही त्याच वळणावर आहे. त्यामुळे पुन्हा दराच्या चढाओढीमुळे व्यावसायिकांचे मरण होऊ नये म्हणून स्पर्धा आटोक्यात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.