जेएनपीटी बंदरातील पहिले खासगी बंदर असलेल्या दुबई वर्ल्ड पोर्ट (डीपी वर्ल्ड) मधील कामगारांनी २१ डिसेंबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी करळफाटा (दि.बा.पाटील चौक)येथे आंदोलनाला सुरुवात केली असून या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. या आंदोलनात बंदरातील १७० पेक्षा अधिक स्टाफमधील कामगार व कामगारांचे कुटुंबीय तसेच उरणमधील राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या आहेत. महिनाभरात डीपी वर्ल्ड व्यवस्थापनासोबत अनेक बैठका होऊनही कोणताही तोडगा निघालेला नाही. तर व्यवस्थापनाकडून बंदरातील कामकाज नियमित सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे.

खाजगी बंदर असलेल्या पूर्वाश्रमीच्या पी. अँड ओ. सध्याचा दुबई पोर्ट वर्ल्ड(एनएसआयसीटी) मधील कामगारांना व्यवस्थापनाने स्टाफमध्ये सामावून घेतले आहे. या कामगारांनी आपल्या हक्कासाठी न्हावा-शेवा स्टाफ असोसिएशनची स्थापना केली आहे. या संघटनेला व्यवस्थापनाने मान्यता देऊन कामगारांच्या वेतन कराराची चर्चा करावी अशी मागणी या असोसिएशनने केली होती. या संदर्भात व्यवस्थापनाला वारंवार सूचना देऊनही व्यवस्थापनाने असोसिएशनसोबत चर्चा करण्यास त्याचप्रमाणे असोसिएशनला मान्यता देण्यास नकार दिला आहे. या कामगारांना उरणचे माजी आमदार विवेक पाटील, विद्यमान आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी कामगारांचे नेते भूषण पाटील, गोपाळ पाटील, प्रशांत पाटील, सुरेश पाटील, अतुल भगत आदी सर्व पक्षीय कामगार व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तसेच डीपी वर्ल्ड बंदरातील कामगारांनीही पाठिंबा दिला आहे. असे असले तरी डीपी वर्ल्ड व्यवस्थापन कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नाही. या संदर्भात जेएनपीटीच्या अध्यक्षांनीही लक्ष घालण्याचे आश्वासन दिलेले होते. तेही पाळण्यात आलेले नसल्याचे कामगार असोसिएशनचे म्हणणे आहे. या संदर्भात बंदराचे प्रवक्ते संजय अहिरे यांनी बंदराचे काम सुरळीत सुरू असून निर्यातीसह आयात मालाचीही ने-आण केली जात असल्याचा दावा केला आहे.