अष्टविनायक सोसायटी, ऐरोली सेक्टर-१५

कट्टय़ावर गप्पा रंगतात. गोष्टी सांगितल्या जातात. सर्व जण त्या मनापासून ऐकतातही. पण तरीही काहीतरी मनोरंजन अशी प्रत्येकाची इच्छा असते. ती शोधण्यासाठी कट्टा हाच एकमेव पर्याय असतो. इथे काही मेजवान्या ठरतात. छोटय़ा स्नेहसंमेलनाच्या तयारीला आरंभ होतो. नाटुकली सादर केली जाते आणि कधीतरी एखाद्या चित्रपटाचा खेळही आयोजित केला जातो. अष्टविनायक गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांना सध्या पुस्तकांची सोबत आहे. विविध विषयांवरील पुस्तकांतून येथील तरुण, महिला आणि मुले ज्ञानकण गोळा करीत आहेत.

संकुलातील तरुण वर्गाचा यात मोठा पुढाकार असतो. त्याला इतरांचा पाठिंबा असतो. या वेगळ्या प्रयोगांचे व्यासपीठ म्हणून ऐरोलीतील अष्टविनायक संकुल उदयास आले आहे. विशेष म्हणजे याच कट्टय़ावर सध्या वाचनालय सुरू करण्यात आले. येथील अनेकांना सध्या पुस्तकांची सोबत आहे. कोणलाही कोणत्याही विषयावरील पुस्तक हवे असल्यास ते उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी प्रत्येकांची धडपड असते.

ऐरोली सेक्टर-१५ मध्ये १९९५ साली अष्टविनायक गृहनिर्माण संस्था स्थापन झाली. संकुलात सहा इमारती आहेत. त्यात ९६ कुटुंबे वास्तव्यास आहेत. आवारात लहान मुले, विविध नागरिक, ज्येष्ठ  नागरिकांसाठी आसन व्यवस्था निर्माण केली आहे.

पुस्तके मार्गदर्शक असतात. त्यातून ज्ञानात अधिक भर पडत असते. याचा विचार करून रहिवाशांनी संकुलात वाचनालय सुरू करण्याचा निर्धार केला. प्रारंभी देणगीच्या रूपातून हे वाचनालय सुरू झाले. त्यानंतर वाचनालयात विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. दरवर्षी वाचनालयात नव्या पुस्तकांची भर घालण्यात येते. यासाठी संकुलातील समिती निधी उपलब्ध करून देते. सध्या कथा, कादंबरी, आत्मचरित्र आणि विविध विषयांवरील २५० पुस्तके उपलब्ध आहेत. येथील संकुलातील प्रत्येक जण वाचनालयात वा घरी पुस्तक घेऊन जातात.

तरुण आणि लहान मुलांच्या विचारांना अधिक चालना मिळेल यावर अधिक भर दिला जातो. सणांच्या काळात तरुण आणि लहान मुलांच्या मागणीनुसार कार्यक्रमांचे नियोजन केले जाते. दरवर्षी संकुलातील मुले दिवाळीला किल्ले बनविण्यात गुंतलेली असतात. भव्य किल्ला साकारण्यासाठी १५ दिवसांची तयारी सुरू असते. यासाठी उत्कृष्ट किल्ले पुरस्कारही संकुलातील मुलांनी मिळवला आहे. महिला व मुलांसाठी जिमखाना तयार करण्यात आला आहे. संकुलात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यात नारळाच्या झाडांची संख्या अधिक आहे. विविध वृक्षरोपांची लागवड आणि त्यांची निगा राखण्यासाठी लागणारी सामग्री पुरविण्याची काळजी येथील रहिवासी घेतात. संकुलात पार्किंगचे नियोजन नीट पद्धतीने करण्यात आले आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्वावलंबन

सण साजरे करण्यासाठी लागणारे मंडप, ध्वनिप्रकाश योजना, सजावटीचे साहित्य, भोजनव्यवस्था केली जाते. पाच वर्षांपासून नियोजनाची जबाबदारी तरुण घेत आहेत. यासाठी संकुलातच सण-उत्सवांसाठी लागणारे साहित्य वापरले जात आहे.