महापालिका प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या हेतूने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमात दुरुस्ती करून तयार करण्यात आलेल्या क्षेत्रसभांची नवी मुंबईत लवकरच अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली. येत्या पंधरा दिवसांत या क्षेत्र किंवा प्रभागसभांच्या आराखडा तयार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  ग्रामसभांच्या धर्तीवर शहरातील नगरपालिका व महापालिका क्षेत्रातही क्षेत्रसभा होणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात ७४ घटनादुरुस्ती अन्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. पालिका क्षेत्रातील या सभांमुळे प्रभागातील समस्यांची थेट मांडणी करणे शक्य होणार आहे. या सभेचा एक कार्याध्यक्ष व एक सचिव प्रभागातील समस्या, तक्रारी प्रभाग अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत. क्षेत्रसभांमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लेखी स्वरूपात मांडल्या जाणार असल्याने पालिका कारभारात लोकांचा सहभाग वाढणार आहे.

७४व्या घटनादुरुस्तीत क्षेत्रसभांची रचना करण्याचे पालिकांना बंधनकारक करण्यात आले आहे. नवी मुंबई पालिकेत ही रचना अद्याप झालेली नाही. राज्यातील अनेक पालिकांना ती केलेली नाही, मात्र येत्या पंधरा दिवसांत याबद्दलचे नियोजन करण्यात येणार असून लवकरच क्षेत्रसभा आयोजित करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जातील.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका

कोणतेही राज्य ७४व्या घटनादुरुस्तीची गांभीर्याने अंमलबजावणी करताना दिसत नाही. याच घटनादुरुस्तीत क्षेत्रसभा किंवा प्रभागसभा घेण्याची तरतूद करण्यात आली आहे, पण राज्यातील एकाही पालिकेने ही रचना केलेली नाही.
-दिनकर सामंत, वास्तुविशारद व माजी शहर नियोजनकार