बँक ऑफ बडोदा आणि सानपाडा पोलीस ठाण्यात गर्दी; असुरक्षिततेमुळे १०० लॉकर रिकामे

जुईनगर सेक्टर ११ येथील बँक ऑफ बडोदामधील चोरीच्या वृत्तामुळे हादरलेल्या लॉकरधारकांनी मंगळवारी पहाटेपासूनच बँकेबाहेर गर्दी केली. आपले लॉकर सुरक्षित आहे की नाही, याचे दडपण प्रत्येकाच्याच मनावर होते. फोडलेल्या लॉकरची यादी बँकेबाहेर लावण्यात आली होती. ज्यांचा ऐवज चोरीला गेला आहे, त्यांना अश्रू आवरता येत नव्हते, तर ज्यांचे लॉकर सुरक्षित आहे, त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. २३७ पैकी १०० लॉकरधारकांनी आज सगळा ऐवज घरी नेला.

पोलिसांच्या पहाऱ्यातच मंगळवारी लॉकरधारकांना बँकेत प्रवेश दिला जात होता. दिवसभर बँकेबाहेर गर्दी होती. बँकेचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. एटीएमही बंद ठेवण्यात आल्याने पैसे काढू इच्छिणाऱ्यांची गैरसोय झाली.  ज्यांचे लॉकर फोडले गेले आहेत, त्यांना ते दाखविण्यात येत होते आणि नंतर दागिने व पैशांसदर्भात जबानी देण्यासाठी सानपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्यात येत होते.

फोडलेल्या ३० लॉकर्सपैकी २७ जणांची जबानी सानपाडा पोलिसांनी दोन दिवसांत नोंदवली आहे.

ज्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते खचून गेले होते आणि त्यांचे नातेवाईक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी मोठी रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. ती गहाळ झाल्यामुळे लॉकरधारकांनी बँकेला लाखोली वाहिली. बँकेबाहेर सुरक्षारक्षकच नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप कहींनी केला.

सानपाडा पोलीस ठाण्यातही गर्दी झाली होती. पोलीस दागिन्यांच्या पावत्या पाहून जबानी नोंदवत होते. सोमवारपासूनच सानपाडा पोलीस ठाणे व बँक ऑफ बडोदा या दोन्ही ठिकाणी पोलीस, लॉकरधारक, बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.

बँकेशेजारीच असलेल्या दुकानदारांनीही आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगितले. बँकेबाहेर लॉकरधारकांना बसण्यासाठी खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. लॉकरधारक चिंताग्रस्त आहेत.

‘आमचा ऐवज कसा मिळणार?’

आम्ही पैसे व दागिने लॉकरमध्ये ठेवले होते. ते चोरीला गेले. आता आमच्या ऐवजाचे काय याची काळजी वाटते आहे. लाखोंचा ऐवज चोरीला गेला आहे. आता आम्ही काय करायचे, असा प्रश्न पडला आहे.

– अर्चना शेलार, जुई नगर

आमचे लॉकर या बँकेत आहे. त्लॉकर फोडले असेल, तर आपल्या दागिने व पैशांचे काय होणार, याची चिंता होती. परंतु यादीत नाव नसल्याचे पाहून हायसे वाटले. आता लॉकरमधील पैसे व दागिने काढून घेणार आहोत.

– सविता यादव, जुई नगर

माझ्या लॉकरमध्ये ५६ तोळ्यांचे दागिने होते. ७० हजार रुपयांची रोकड होती. ते सगळे गेले आहे. सानपाडा पोलिसांना जबानी दिली आहे. आमचे दागिने मिळतील का, याची चिंता आहे. रात्रभर झोप लागली नाही.     
– भक्ती शेठ, सानपाडा, सेक्टर ७

काही दिवसांपूर्वीच दिवाळीत लॉकरमधील रक्कम व दागिने काढून घरी नेले होते म्हणून वाचलो. सुमारे ५० लाखांचा ऐवज होता. आम्हा पती-पत्नीचे लॉकर्स याच बँकेत आहेत.

– सुनिता दयाराम सरोज,वाशी सेक्टर ४

ज्या दुकानातून भुयार काढले आहे, त्याच्या बाजूलाच माझे दुकान आहे. इथे सुरक्षा एजन्सीचे माझे कार्यालय आहे. भुयार खोदले गेले, पण आम्हाला कसलाच सुगावा लागला नाही.

– अमोल मोरे,बँकेशेजारील गाळेधारक