बेलापूर मतदार संघात ४८.९१ टक्के तर ऐरोली मतदार संघात ४८.७९ टक्के मतदान

नवी मुंबई ठाणे लोकसभा मतदारसंघातील ऐरोली व बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांत सुरळीत व शांततेत मतदान झाले. दुपापर्यंत मतदारांनी निरुत्साह दाखवल्यानंतर सायंकाळी चारनंतर मतदार बाहेर पडले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत अवघे सहा टक्के झालेल्या मतदानात वाढ होत सायंकाळी पाचपर्यंत  बेलापूर मतदार संघात ४८.९१ टक्के तर ऐरोली मतदार संघात ४८.७९ टक्के मतदान झाले.

वाशी व ऐरोली येथे सजवलेलं मंडप, सनईचे सूर आणि महिला मतदारांचे औक्षण, बोगस मतदान, मतदार यंत्रे बंद पडण्याच्या तक्रारी या किरकोळ घटनांव्यतिरिक्त सुरळीत मतदान झाले.

कोपरखैरणे येथे सेंट मेरी शाळेतील मतदान केंद्रांवर दक्षा मेंगे या महिलेच्या नावावर आधारकार्ड दाखवून अन्य महिला मतदान करून गेल्याचा प्रकार घडला. निवडणूक अधिकाऱ्यांनी खातरजमा न करता मतदान करू दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर या महिलेला प्रतिरूप मतदान करण्याची मुभा देण्यात आली. मात्र चौकशी करण्यासाठी तक्रार करणार असल्याचे दक्षा मेंगे यांनी सांगितले.

वाशीतील आयसीएल झुणझुणवाला महाविद्यालयात ११ ते १ वाजेदरम्यान ३१ नंबर मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन ते तीन वेळा यंत्र बंद पडले होते. साधारण तासाभराने ते सुरू झाले. त्यामुळे ताटकळत उभे राहावे लागल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.

रा. फ. नाईक शाळेत अधिकाऱ्यांनीच राष्ट्रवादीला मतदान करा असा प्रचार केल्याचा आरोप काही मतदारांनी केला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे. वाशी-साईनाथ शाळा, शिरवणे गाव, कोपरखैरणे रा. फ. नाईक, नेरूळ या ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदान उशिरा सुरू झाले. कोपरखैरणे येथे मतदान यंत्र उलटे लावली असल्याची तक्रार अपक्ष उमेदवार विनोद पोखरकर यांनी केली.

वाशी सेक्टर २८ मधील टिळक शाळेमध्ये मतदान रांगांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बाचाबाची घडण्याची घटना सोडल्यास कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विख्यात गायक शंकर महादेवन यांनी पत्नीसह याच ठिकाणी मतदान केले. कोपरखैरणे येथे माजी मंत्री गणेश नाईक यांचा परिवाराने तर आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे मतदानाचा हक्क बजावला.

मोबाइल बंदी दिसलीच नाही

मतदानावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, मतदान केंद्राच्या २०० मीटर आणि शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुरुवातीला आणि मतदानाची वेळ संपत आल्यावरच मतदान केंद्रावर मोबाइल बंदी होती. मात्र दिवसभर मतदार मोबाइल मतदान केंद्रावर घेऊन जाताना दिसत होते.

उन्हात ताटकळ

बेलापूर विधानसभा मतदारसंघातील वाशी विभागात काही ठिकाणी उत्तम व्यवस्था होती, तर काही ठिकाणी मतदारांना उन्हात रांगा लावून घामाघूम होऊन मतदान करावे लागले. सध्या कडक उन्हाळा सुरू असून नवी मुंबईत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा आहे. काही मतदान केंद्रांवर व्यवस्था केली होती, तर काही ठिकाणी मतदारांना उन्हात रांगा लावाव्या लागल्या. वाशीतील टिळक शाळेत उन्हात ताटकळत उभे राहावे लागत होते.

ऑक्सिजन लावून मतदान

वाशीतील ६३ वर्षीय मतदार डॉ. सुधीर भार्गव यांनी आजारी असल्याने ऑक्सिजनची नळकांडी लावलेली असतानाही आपला मतदानाचा हक्क बजावला. ते स्वत: डॉक्टर आहेत. टिळक हायस्कूल, सेक्टर २८ येथे त्यांनी मतदान केले.