एक ग्रामपंचायत भाजपकडे

उरण : उरणमधील सहा ग्रामपंचायतींची १५ जानेवारी रोजी निवडणूक झाली होती. सोमवारी झालेल्या मतमोजणीत  सहापैकी चार ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची सत्ता, एक ग्रामपंचायत भाजपकडे आल्याचा दावा करण्यात आला आहे, तर एक त्रिशंकू अवस्थेत आहे. चाणजे, म्हातवली, फुंडे, केगाव या चार ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी  तर भाजपने वेश्वी ग्रामपंचायत ताब्यात ठेवली आहे. तीन आघाडय़ांना समान जागा मिळाल्याने नागांवमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

केगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांपैकी ११ जागा महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने जिंकल्या आहेत. चाणजे ग्रामपंचायतीमधील १७ पैकी ९ जागा महाविकास आघाडीला, तर ८ जागांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. म्हातवली ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी ६ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर पाच जागा भाजपने जिंकल्या आहेत. फुंडे ग्रामपंचायतीमध्ये ९ जागांपैकी ६ जागा महाविकास आघाडीने तर ३ जागांवर भाजपने विजय संपादन केला आहे. त्याचप्रमाणे नागाव ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी ६ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या असून वेश्वी ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. नागांव ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे  ३, शिवसेनेचे ३ तर परिवर्तन पॅनलचे ३ सदस्य निवडून आल्याने या ठिकाणी त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी करण्यासाठी एकूण ६ टेबल लावण्यात आले होते. निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी व उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.