भराव, राडारोडा टाकून सपाटीकरण

नवी मुंबई</strong> : ऐरोली, दिवा, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, करावे या गावांच्या खाडीकिनारी उभारण्यात येणाऱ्या शेतघरांसाठी काही ग्रामस्थ खारफुटी, कांदळवनाचा नाश करीत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. नवी मुंबई शहर वसविण्याअगोदर काही कोळी बांधव खाडीकिनारी असलेल्या खडकाळ भागाचा वापर हा मासळी सुकविण्यासाठी करीत होते. हाच भाग आता शेतघर म्हणून विकसित करण्यात आला आहे. यासाठी आजूबाजूच्या भागात भराव, अथवा राडारोडा टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे.

नवी मुंबईला साठ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटी संरक्षण व संवर्धनाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिल्यानंतर या भागात होणारी खारफुटीची कत्तल मोठय़ा प्रमाणात कमी झाली आहे. त्यापूर्वी चुलीवरील जेवणासाठी या खारफुटी लाकडांचा सरपण म्हणून वापर केला जात होता. खारफुटीची तोड कमी झाल्याने आता या खाडीकिनारी घनदाट असे कांदळवने तयार झालेली आहेत. भरतीचे पाणी बांधबंदिस्ती नसल्याने काही ठिकाणी शहरात घुसले असून त्याद्वारे आलेल्या खारफुटीच्या बीजांचे रोपण झाले आहे. त्यामुळे नवी मुंबईत आता खारफुटी क्षेत्र वाढले आहे.

या सर्व कांदळवनाचा उपयोग काही ग्रामस्थ हे खाडीकिनारी शेतघर उभारण्यासाठी करीत आहेत. त्यामुळे ऐरोली, दिवा, घणसोली, गोठवली, कोपरखैरणे, वाशी, करावे या गावांच्या पश्चिम बाजूस काही ग्रामस्थांनी खाडीकिनारी शेतघरे विकसित केली आहेत. हे संपूर्ण क्षेत्र हे वनक्षेत्र असून तसे फलक जागोजागी लावण्यात आलेले आहेत. तरीही या खाडीकिनारी शेतघर व मत्स्यसंवर्धन तलाव तयार केले आहेत. या शेतघरांचा वापर हा ओल्या मेजवाणीसाठी केला जात आहे. या ठिकाणी विद्युतपुरवठा नसल्याने विद्युत जनित्राचा वापर करून ह्य़ा मेजवाण्या होत असल्याचे समजते. त्यासाठी मेजवाणी करणाऱ्या समूहाला दहा ते बारा हजार रुपयांचे शुल्क देखील आकारले जात आहे. गेली अनेक वर्षे वन अधिकारी या शेतघरांकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे शेतघरांची संख्या वाढत आहे. त्यासाठी राडारोडा टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. या भागात अगोदर मिठागरे असल्याने काही मिठागर मालकांची जुनी घरे देखील या खाडीकिनारी आहेत.

नवी मुंबईच्या खाडीकिनारी असलेल्या शेतघरांबाबत अद्याप रीतसर तक्रार आलेली नाही. तरीही वन क्षेत्रात अशा प्रकारची शेतघरे असल्यास त्यांचा तपास करून कारवाई केली जाईल.

-एन. जी. कोकरे, कांदळवन क्षेत्र अधिकारी, ठाणे</strong>