जलप्रवाशांना दिलासा; ९० ऐवजी ८० रुपये तिकीट

उरण : डिझेल दरवाढीचे कारण देत मोरा ते मुंबई या जलवाहतुकीसाठी वाढवलेले दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने याची दखल घेत १० रुपयांनी तिकीट दर कमी केले आहेत. त्यामुळे ९० रुपये झालेले तिकीट दर आता ८० रुपये झाले आहेत. यामध्ये तिकिटाचे दर ७० रुपये असून १० रुपये प्रवासी कर आकारण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या देखरेखीखाली मोरा ते मुंबई दरम्यानची जलसेवा सुरू आहे. मुंबईला जोडणारी बारमाही अशी ही एकमेव जलसेवा आहे. या जलमार्गाने उरणमधील मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी, व्यावसायिक तसेच काही प्रमाणात मुंबईत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना लाभ होत आहे.

डिझेलची दरवाढ झाल्याने जलवाहतूक संस्थेने दर वाढविण्याची मागणी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे केली होती. त्यानुसार पावसाळी कालावधीसाठी २० रुपयांनी वाढविण्यात आलेले तिकीट दर कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे या प्रवासासाठी ९० रुपये प्रवाशांना मोजावे लागत होते. लोकसत्ताने या संदर्भात वृत्त देत प्रवाशांची नाराजी मांडली होती. गेल्या काही वर्षांत ४५ रुपये असलेले तिकीट दर आता ९० पर्यंत गेल्याने हा प्रवास परवडत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने २० रुपये झालेली तिकीट दरवाढ कमी करीत आता १० रुपये वाढ कायम ठेवली आहे.

या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रभाकर पवार यांच्याशी संपर्क साधला असता या वेळी पावसाळी दरवाढीनंतर ते दर कायम ठेवण्याची मागणी करण्यात आलेली होती. मात्र मेरिटाइम बोर्डाने त्यात बदल केल्याने आता मोरा ते मुंबई दरम्यानचे तिकिटाचे दर हे ८० रुपये असतील असे सांगितले.