नवी मुंबई : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरात बुधवारी निसर्ग वादळाबरोबरच जोरदार पाऊस झाला असून यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली असून सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा आहे.

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण सलग तीन वर्ष शंभर टक्के भरले आहे. मागील वर्षी तर धरण परिसरात ९८ वर्षांनंतर प्रथमच  ५००० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरण भरून वाहात होते. त्यामुळे जून महिना उजाडला तरी धरणात पुढील चार महिने पुरेल एवढा जलसाठा शिल्लकअसल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली तेव्हा धरणात फक्त ४० टक्के म्हणजेच ६८.१६३ दशलक्षघनमीटर पाणी शिल्लक होते. परंतु यंदा धरणात सोमवापर्यंत ७४.२२९ दशलक्ष घनमीटर जलसाठा  शिल्लक होता.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात शहरात १० टक्के  पाणीकपातीची वेळ आली होती. मात्र गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणात आता मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील चार महिने तो नवी मुंबईकरांना पुरू शकतो. त्यात गेले दोन दिवस नवी मुंबई व धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीसाठय़ात वाढ होत आहे.

दोन दिवसांत ५६ मिमी पाऊस

* धरण पातळी : ८८.२० मीटरला धरण पूर्ण भरते.

* सध्याची पातळी : ७३.७६ मीटर

* दोन दिवसांत पडलेला पाऊस : ५६ मिमी.

* धरणातील जलसाठा : ७४.२२९ दशलक्ष घनमीटर

* २०१८ ला पडलेला पाऊस : ३३२८.२०मिमी.

* २०१९ ला पडलेला पाऊस : ५२५१.२० मिमी.

नवी मुंबई शहर हे मोरबे धरणामुळे जलसंपन्न आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असून शहराला सप्टेंबर २०२० पर्यंत पुरेल.

-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त