आठवडाभरात मोठी वाढ; ४ जणांवर गुन्हा

नवी मुंबई : दैनंदिन करोना रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांपासून १ हजार २०० पेक्षा अधिक झाल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ झाल आहे. गेल्या आठवड्यात ४१२ पर्यंत असलेली प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या सोमवारी चार हजारांपेक्षा अधिक झाली आहे. पहिल्या प्रवर्गात ३०५५, दुसऱ्या प्रवर्गात १०४० तर तिसऱ्या प्रवर्गात १ इतकी प्रतिबंधित क्षेत्रे झाली आहेत.

ज्या इमारतीमध्ये एक वा पाचपेक्षा कमी रुग्ण आढळतात असे घर किंवा मजला अथवा संपूर्ण इमारत तेथील परिस्थितीनुसार प्रवेश प्रतिबंधित केली जात आहे. पालिका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्राचे तीन प्रवर्ग केले आहेत. प्रवर्ग एकमध्ये गृहसंकुले, सोसायटी, प्रवर्ग दोनमध्ये वैयक्तिक घरे, बंगलो आणि दहापेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या क्षेत्राला प्रवर्ग ३ अशी रचना केली आहे.

तेथील रुग्णांच्या परिस्थितीचा विचार करून ते क्षेत्र ये-जा करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंधित करता येईल अशाप्रकारे सुरक्षा भिंती उभारण्यात येत आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील वर्दळ पूर्णपणे थांबविणे करोना संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित व्यक्तीच्या दरवाज्याबाहेर विलगीकरण कालावधी नमूद केलेला फलक लावण्यात येत आहे. त्याची माहिती संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही देण्यात येत आहे. अशा व्यक्तींनी घराबाहेर पडणे पूर्णत: प्रतिबंधित करण्यात आले असून त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याबाबत सोसायटी अथवा संबंधित विभाग कार्यालयामार्फत पुरवठादार जोडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. करोनाबाधित व्यक्तीने त्याचे घर सोडून बाहेर यायचे नाही ही जबाबदारी सोसायटी पदाधिकारी यांच्यावरही देण्यात आली आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा प्रकारे  चार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गृहविलगीकरणातील ९८७ बाधितांच्या हातावर शिक्के

गृहविलगीकरणातील रुग्णांमुळे करोना प्रादुर्भाव वाढू नये, त्यावर वाचक ठेवण्याकरिता त्यांच्या हातावर शिक्के मारले जात आहेत. आतापर्यंत ९८७ जणांच्या हातावर हे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यावर ‘नवी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी गृहविलगीकरणात असल्याचा अभिमान’ असा मजकूर त्यावर आहे. ती बाधित व्यक्ती ज्या घरात वास्तव्यास आहे त्या घराच्या दरवाज्याबाहेर विलगीकरण कालावधी नमूद केलेला फलक लावण्यात आला आहेत. त्याने त्याचे घर सोडून बाहेर पडायचे नाही,अशा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत.

तुर्भेतील रसना बारला टाळे

वाढत्या करोना रुग्णांमुळे आस्थापनांवर अनेक निर्बंध घातले आहेत, तरीही या नियमांचे पालन होताना दिसत नाही. पालिकेने आतापर्यंत चार पबला टाळे ठाकले आहेत. आता तुर्भे सेक्टर २३  येथील रसना बारवर  दक्षता पथकाने धडक कारवाई करीत सात दिवसांसाठी बार बंद केला आहे. त्याचप्रमाणे सेक्टर १५ सीबीडी बेलापूर येथील डी मार्टलाही ५० हजार दंडात्मक रक्कमेची कारवाई करण्यात आली आहे.

बिनदिक्कत घराबाहेर

गृहविलागीकारणात असूनही बिनदिक्कत घराबाहेर फिरणाऱ्या चार जणांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात एक दाम्पत्य असून अन्य दोघे जण आहेत. सेक्टर २३ येथील मेरिलँड इमारतीत राहणारे एक दाम्पत्य घराबाहेर फिरत होते. त्यांच्या हातावर असलेल्या शिक्क्यावरून काही जणांनी ते बाधित असल्याचे ओळखले व त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  जुईनगर सुयोग सोसायटी सेक्टर २४ येथील रहिवासी असलेले दोन बाधित व्यक्ती घराबाहेर पडून बिनदिक्कत फिरत होते. त्यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.