जेएनपीटी बंदरातील सिंगापूर या चौथ्या बंदरात स्थानिक भूमिपुत्रांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून यातील १७ स्थानिक भूमिपुत्र मुलींना नोकरीत सामावून न घेतल्याने मंगळवार, २८ ऑगस्टपासून करळ येथे या मुली आंदोलन करणार आहेत. या प्रश्नी प्रकल्पग्रस्तांना संघटित करण्यासाठी सध्या उरणमधील सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत.

बंदरातील नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटना तसेच राजकीय नेत्यांनी अनेक मोर्चे काढले. आंदोलने केली. त्यानंतर येथील स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घेण्यात आले.

या बंदर व्यवस्थापनाकडून टाकण्यात आलेल्या शैक्षणिक अटीनुसार येथील प्रकल्पग्रस्तांच्या मुलींनीही शिक्षण पूर्ण केलेले आहे. या मुलींच्या वर्षभरापूर्वी मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

वैद्यकीय परीक्षाही झाली असतानाही त्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. या संदर्भात मुलींनी एकत्र येत सर्व पक्षीय नेते, सामाजिक संस्था तसेच ग्रामस्थांशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

या संदर्भात जेएनपीटी भेटी दरम्यान केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी चौथ्या बंदराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुलींना सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत.