सुरक्षारक्षकांकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे उघड

नवी मुंबई : उपचारांदरम्यान रुग्ण दगावल्याने बुधवारी पहाटे वाशीतील पालिका रुग्णालयात नातेवाईकांनी तोडफोड करीत साहित्याची नासधूस केली. या घटनेनंतर पालिका रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचे समोर आले आहे. दहा सुरक्षारक्षकांची गरज असताना फक्त पाच सुरक्षारक्षक उपस्थित होते. त्यांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली नाही. पोलीस संरक्षण देण्याची प्रक्रिया मात्र सुरू आहे. या घटनेत रुग्णालयात नेमके किती नुकसान झाले याची मोजदाद गुरुवारीही सुरूच होती.

व्यंकट सूर्यवंशी या रुग्णाचा उपचारांदरम्यान वाशीच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या दोन मुलांनी आणि अन्य दोन मित्रांच्या मदतीने रुग्णालयात तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एकूण सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील संदेश सूर्यवंशी, रुपेश सूर्यवंशी, पंकज जाधव आणि रोहित नामवाड या चौघांना अटक करीत १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तीन महिलांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू आणि एक दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.

घटना घडली त्याप्रसंगी रुग्णालयात पाच सुरक्षारक्षक उपस्थित होते. मात्र यातील कोणीही ती रोखण्यासाठी प्रयत्न केला नाही. उलट मोबाइलवर चित्रीकरण करण्यात धन्यता मानली असल्याची गंभीर बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या चित्रीकरणात सुरक्षारक्षक हल्ला करणाऱ्यांना अडवताना दिसले नाहीत, याबाबत पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनीही सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुरक्षारक्षक सक्षम नसल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

पोलिसांचे म्हणणे सुरक्षारक्षक दलाचे अधीक्षक नितीन भगत यांनी फेटाळले आहे. चारही आरोपींना आमच्याच सुरक्षारक्षकांनी पकडल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी किमान १० सुरक्षारक्षकांची एकाच वेळेस गरज आहे. मात्र सध्या सहा सुरक्षारक्षक आहेत. जेवढी मागणी होती तेवढाच पुरवठा केला आहे. पालिका रुग्णालयात सध्या ५१ सुरक्षारक्षक असून यात ११ महिला सुरक्षारक्षक आहेत. रात्रपाळीत चार सुरक्षारक्षक वाढवण्याची मागणी पालिकेकडे केली आहे, मात्र याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

आता सर्वकाळ पोलीस तैनात रुग्णालयांत पोलिसांची उपस्थिती असते. रात्रगस्तही घातली जाते. करोना रुग्णालयांनाही सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची स्थायी सुरक्षा देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सहा लाखांचे नुकसान?

रुग्णालयात झालेल्या तोडफोडीत अंदाजे सहा लाखांचे नुकसान झालेले आहे. यात खिडक्यांची तावदाने, काचेचे सामान, फर्निचर तसेच दोन कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर), सलाइन बाटल्या, स्टेशनरीचा समावेश आहे. यात अजून वाढ होऊ  शकते अशी माहिती प्रथम संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली.

सुरक्षा वाढविणार

पालिका रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या तोडफोडीत डॉक्टर्स व कर्मचारी यांनाही धक्काबुक्की झाली. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. यावर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी करोना योद्ध्यांचे मनोधैर्य खचू दिले जाणार नाही. संबंधितांना कडक शासन होण्यासाठी पालिका पोलिसांना सर्वोतोपरी मदत करेले असे सांगितले. एकही दिवस सुट्टीन घेता करोनायोध्दे काम करीत असताना ही घटना घडल्याने याचा सर्वत्र निशेष व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील वाशी रुग्णालयाबरोबरच विविध ठिकाणी पोलीस व्यवस्था पुरवण्याबरोबरच तसेच सुरक्षारक्षकही वाढवण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.