पंतप्रधान मोदी यांचे मत; नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन

नवी मुंबई विमानतळाच्या नावाने अनेक खासदार-आमदार झाले, सरकारे बनविली गेली, पण विमानतळ झाला नाही. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात या प्रकल्पाला गती आली आणि आपल्या काळात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झालेली आहे. प्रकल्प लटकवायचे, अडकवायचे आणि भरकटत ठेवायचे हे यापूर्वीच्या सरकारचे धोरण होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन सभारंभी काँग्रेस सरकारचे नाव न घेता केली. जागतिकीकरण हे नवीन युगाचे वास्तव असून, अशा वातावरणात प्रगती करण्यासाठी पायाभूत सुविधाही दर्जेदार असणे अपरिहार्य आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करून मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज  जयंतीच्या पूर्वसंध्येला एका प्रकल्पाचे लोकार्पण आणि दुसऱ्या प्रकल्पाची सुरुवात करीत असल्याचा आनंद व्यक्त केला. देशाला साडेसात हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्या समुद्रशक्तीचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. उत्पादने वेळेत परदेशात पोहोचल्यास उद्योजकांना नफा होतो आणि उशिरा पोहोचल्यास तोटा. त्यामुळे जागतिक व्यापारासाठी बंदरविकास हे आपल्या सरकारचे ध्येय आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा ग्रीन फील्ड विमानतळ  उभा राहात आहे. यापूर्वीच्या सरकारने अशा प्रकारचे दहा लाख कोटींचे प्रकल्प अडगळीत टाकले होते. भाजप सरकारने हे प्रकल्प कार्यान्वित केलेले आहेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. देशातील सर्व विमानतळांवर जेवढी प्रवासी संख्या होती तेवढी आता केवळ एकाच मुंबई विमानतळावर दिसून येते. यापूर्वीच्या सरकारांनी पुढील २०-२५ वर्षांचा विचार करून नियोजन न केल्याने आजची स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सरकारने हवाई धोरण तयार केली आहे. त्याअंतर्गत देशात १०० छोटे-मोठे विमानतळ प्रकल्प उभारले जात असून सर्वसामान्य माणसालाही विमान प्रवास शक्य झाला पाहिजे अशा योजना आखल्या जात आहेत. केवळ एक वर्षांत ९०० नवीन विमाने प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत, मात्र यापूर्वी केवळ ४५० विमाने देशसेवेत होती. विमानसेवेमुळे भारतीय पर्यटनाला चांगला वाव मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या २२६८ हेक्टर जमिनीवरील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन आणि जेएनपीटीमधील साडेचार हजार कोटी रुपये खर्चाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने केले. २२ महिन्यांत या विमानतळावरून पहिले उड्डाण होईल असे जाहीर करण्यात आले आहे. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री अशोक गजपती राजू उपस्थित होते.

या विमानतळासाठी आठ परवानग्या आवश्यक होत्या, मात्र पंधरा वर्षांत एकही परवानगी मिळाली नव्हती. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे या आठ परवानग्या तात्काळ मिळाल्याने या कामाला आज सुरुवात होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढत आहे, पण काही रखडलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना अडथळा येत होता. जेएनपीटीमधील चौथे बंदर आणि विमानतळाच्या कामाची सुरुवात यामुळे राज्याच्या दरडोई उत्पन्नात भर पडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जेएनपीटीचे चौथे बंदर हे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. कंटेनरच्या वाहतुकीमुळे प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होत असल्याने अंतर्गत वाहतुकीसाठीही बीपीटीपासून जेएनपीटीपर्यंत जलमार्ग निर्माण केले जाणार आहेत. यामुळे मुंबईतील रस्त्यावरील एक हजार कंटेनर कमी होऊ शकतील असा विश्वास केंद्रीय परिवहनमंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे आंदोलन झालेच नाही

पंतप्रधान मोदी यांनी वीस मिनिटांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केल्याने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात त्यांना प्रणाम करीत असल्याचे त्यांनी सांगताच या टाळ्या टिपेला पोहोचल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार त्यांचे नाव निमंत्रणपत्रिकेत नसल्याने आंदोलन करणार होते, ते झालेच नाही. वहाळ येथे आमदार मनोहर भोईर यांनी तसा प्रयत्न केला, पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सिडको भवन येथे काही शिवसैनिक मोर्चा आणणार असे कळल्याने काही जणांना तेथेही ताब्यात घेतले गेले. नावे नाहीत म्हणून आंदोलन केल्यास आपले हसे होईल हे लक्षात आल्यानंतर हे मोठे आंदोलन म्यान करण्यात आले.