|| विकास महाडिक

राज्य शासनाच्या आदेशाने समुद्री महामार्ग, वाशी खाडीपूल या प्रकल्पांना कोटय़वधी रुपयांचा निधी देणारे श्रीमंत महामंडळ सिडको आता नाशिक येथील मेट्रो प्रकल्पासाठी ११० कोटी रुपये राज्य शासनाच्या वतीने देणार आहे. सिडकोने नाशिकमध्ये नवीन नाशिक हे शहर वसविले आहे. या मेट्रोचा प्रकल्प विकास आराखडा सिडकोने तयार केलेला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने नाशिकमध्ये ‘टायरबेस मेट्रो’ प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअगोदर या शहरासाठी मेट्रो प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते, पण प्रवाशी संख्या कमी असल्याने हा प्रकल्प गुंडाळून त्याऐवजी ‘टायर बेस’ मेट्रो प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच बसमध्ये १५० प्रवाशांची वाहतूक करणे शक्य असलेला हा देशातील पहिला प्रकल्प आहे. ३२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग तयार केला जाणार असून त्यावर ४० जोडबस धावणार आहेत. गंगापूर ते नाशिक रोड हा २२ किलोमीटर लांबीचा तर गंगापूर ते मुंबई नाका हा दहा किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गासाठी केंद्र व राज्य सरकार निधी देणार आहे. यात केंद्र सरकारचे वीस टक्के तर राज्य सरकारचे वीस    टक्के अर्थसाहाय्य राहाणार आहे. शिल्लक ६० टक्केनिधी हा नाशिक मेट्रो कंपनी विविध वित्त संस्थांकडून कर्ज घेऊन उभारणार आहे. यात राज्य शासनाचा हिस्सा राज्य सरकारची श्रीमंत कंपनी सिडको देणार असून तो ११० कोटी रुपये आहे. हा निधी लवकर वर्ग करण्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी घेतली जाणार आहे.

सिडकोकडे नऊ हजार कोटी रुपयांपर्यंत निधी विविध वित्त संस्थांकडे ठेवी स्वरूपात पडून आहे. त्यावर राज्य सरकारचा डोळा असून अनेक प्रकल्पांना यापूर्वी सिडकोकडून मदत देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्य़ातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची जबाबदारी सिडकोवर असून जालना येथील नव नगरासाठीही कोटय़वधी रुपये येत्या काळात दिले जाणार आहेत.