पुनर्वसन केंद्र उभारण्याचे आदेश; ऑगस्टनंतर करोना साथीची दुसरी लाट?

नवी मुंबई : पालिका क्षेत्रात वैद्यकीय तपासण्या वाढविण्यात आल्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ती आता २५ हजारांच्या उंबरठय़ावर आहे. यातील तीन हजार ९०० रुग्ण प्रत्यक्षात उपचार घेत असून ऑगस्टनंतर करोना साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने खासगी रुग्णंलयाना जास्तीत जास्त कोविड पुनर्वसन केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी या रुग्णालयाने चाळीस खाटांचे केंद्र उभे केले आहे.

मुंबईतील धारावी झोपडपट्टीएवढी लोकसंख्या असलेल्या नवी मुंबईत गेले पाच महिने करोना साथ रोगाचा प्रार्दुभाव मोठय़ा प्रमाणात आहे. केंद्रीय आरोग्य व संशोधन मंत्रालयाच्या आदेशावरून शहरातील नागरिकांच्या जास्तीत जास्त तपासण्या करण्यात येत आहेत. नवी मुंबई पालिकेच्या वतीने दिवसाला दोन हजार तपासण्या करण्यात येत असून त्यात सरासरी तीनशे ते चारशे रुग्ण हे करोनाबाधित असल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे आरोग्य पथक या बाधित रुग्णांना वेळीच अलगीकरण करीत असल्याने या आजाराचा प्रसार होत नसल्याचा दावा केला जात आहे.

दिवसागणिक चार हजार तपासण्यांमुळे मागील एक महिन्यात बाधित रुग्णांची संख्या वाढून ती आता २४ हजार झाली असून माहिनाअखेर हा आकडा २५ हजारांच्या घरात जाणार असल्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. या रुग्णांतील अत्यवस्थ तसेच प्राणवायूची आवश्यकता असलेल्या रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी पालिकेने खासगी व पालिकेची आरोग्य व्यवस्था तयार ठेवली आहे. विविध खासगी व पालिका रुग्णालयात सध्या तीन हजार ९०० रुग्ण उपचार घेत असून यात बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण ८२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाफील राहू नका हा दिलेला सल्ला अमलात आणला जात असून शहरातील खासगी रुग्णालयांना तयार राहण्याचे आदेश दिले जात आहेत. नवी मुंबईत हिरानंदानी फोर्टिज, आपोला, एमजीएम, रिलायन्स, डी. वाय. तेरणा ही मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत जास्तीत जास्त कोविड रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा उभी करण्याचे आदेश पालिका आयुक्त आभिजित बांगर यांनी दिले आहेत. वाशी येथील हिरानंदानी फोर्टिज रुग्णालयाने चाळीस खाटांचे पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. या रुग्णालयाला पालिकेने सवलतीच्या दरात जागा दिली आहे.  त्या बदल्यात हे रुग्णालय आर्थिकदृटय़ा दुर्बल घटकांसाठी वर्षांला ८०० खाटा मोफत देत आहे.

एमजीएममध्ये प्राणवायू यंत्रणा

फोर्टिज रुग्णालयाबरोबर पालिकेने एमजीएमचे सानपाडा येथील नियोजित रुग्णालय ताब्यात घेतेल असून त्या ठिकाणी प्राणवायू पुरवठा होईल अशा यंत्रणा उभी केली आहे.

खाटांचे नियोजन                                                                                                                                     

शहरातील अत्यावस्थ रुग्णांना खाटा मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी संगणकाच्या एका क्लीकवर खासगी व पालिका रुग्णालयातील कोविड खाटांची माहिती प्रसारीत केली जात असून यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेतील एका उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.