News Flash

पालिकेत भाजपची सत्ता कठीण?

११ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहण्याचे संकेत; एक गट शिवसेनेच्या संपर्कात

११ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहण्याचे संकेत; एक गट शिवसेनेच्या संपर्कात

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबासमवेत नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी, किमान अकरा नगरसेवकांनी राष्ट्रवादीतच कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्याचप्रमाणे तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह सहा-सात नगरसेवक भाजपपेक्षा शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाईक यांच्या भाजपप्रवेशानंतर नवी मुंबई महापालिकेची सत्ता सहजासहजी भाजपच्या ताब्यात येण्याची शक्यता नाही.

राज्यात सुरू असलेल्या भाजपमधील महाभरतीत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक सामील झाले आहेत. राज्यातील राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेत्यांनी स्वीकारलेली पद्धत नाईक कुटुंबानेदेखील अमलात आणली आहे. संदीप नाईक यांच्या बुधवारच्या भाजपा प्रवेशानंतर पुढील महिन्यात गणेश नाईक भाजपा प्रवेश होणार आहे. नाईक कुटुंबासोबत भाजपमध्ये जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या ३०-३५ राहण्याची शक्यता आहे. पालिकेत सत्तापालट करण्यासाठी राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक पक्षांतर करणे आवश्यक आहे. त्यात भाजपच्या मूळ सहा नगरसेवकांची भर पडल्यास ही संख्या ४२पर्यंत जाईल. मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादीच्या पडझडीत शिवसेनेलाही फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे कमळ हाती घेण्याची तयारी नसलेले काही नगरसेवक शिवसेनेचे धनुष्य उचलणार आहेत.

यात तुर्भे येथील बाहुबली नगरसेवक माजी स्यायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. कुलकर्णी

स्वबळावर चार नगरसेवक निवडून आणतात. त्यांचा कल शिवसेनेकडे आहे. नाईक यांना हा मोठा धक्का आहे. कुलकर्णी यांच्या सोबत आणखी सहा नगरसेवक शिवसेनेचे शिवबंधन बांधण्याच्या मन:स्थितीत आहेत. शिवसेनेचे सध्या ३९ नगरसेवक असून त्यात दहा नगरसेवकांची भर पडल्यास ही संख्या ४९पर्यंत जाईल. त्यामुळे महापौरपदावर शिवसेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अकरा नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा दाखवून पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेरुळमधील नगरसेवक अशोक गावडे हे या नगरसेवकांचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर महापौर झालेले अपक्ष सुधाकर सोनावणे आणि त्यांच्या पत्नी हेदेखील भाजपप्रवेशासाठी अनुकूल नाहीत. नाईक यांच्यामागे भाजपमध्ये फरफटत जाण्याची इच्छा नसल्याचे अनेक नगरसेवक खासगीत सांगत आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

खरणेत शक्तिप्रदर्शन

महापौर बंगल्यावर सोमवारी स्नेहभोजनाच्या निमित्ताने नाईक यांच्या भाजपप्रवेशाची बिगुल वाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी खरणे येथील नाईक यांच्या मुख्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी केली. दोन ते तीन हजार

कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सकाळपासून सुरू झालेली ही गर्दी दुपारी चांगलीच वाढलेली दिसून आली. या गर्दीला माजी मंत्री गणेश नाईक अथवा संदीप नाईक सामोरे न गेल्याने दुपारनंतर ही गर्दी ओसरली.

नाईक यांचे पुतणे व माजी महापौर सागर नाईक या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. संदीप नाईक यांनी विधानसभा अध्यक्षाकडे राजीनामा सादर करण्यास मुंबईत गेल्याने ते येऊ शकणार नसल्याचा निरोप उशिरा देण्यात आला तर मोठे नाईक‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे नाईकांची भेट घेण्याची नगरसेवकांची इच्छा अर्धवट राहिली.

मंदा म्हात्रेंची मनधरणी

नाईक यांच्या भाजपा प्रवेशाने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा संताप सर्वात अनावर झाला आहे. आपल्या पाठोपाठच प्रत्येक पक्षात प्रवेश करणाऱ्या नाईक यांचा हा भाजपा प्रवेश स्वार्थी आणि भ्रष्टाचारासाठी आहे. असा थेट आरोप त्यांनी केला आहे. हिंमत असेल तर आपल्या समोर त्यांनी भाजप सोडून निवडणूक लढवावी असे आव्हानही दिले आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे घर गाठले. नाईक यांच्या भाजपा प्रवेशाने जुन्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे येथील अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी या प्रवेशाचे स्वागत केले आहे. यापूर्वी त्यांनी पक्ष मुख्यालयात जाऊन विरोध दर्शविला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:44 am

Web Title: navi mumbai 11 corporators indicates to stay in ncp zws 70
Next Stories
1 शहरात ‘लेप्टो’चा ताप वाढणार
2 शहरातील रस्ते खड्डय़ात
3 नाईकांवर कार्यकर्त्यांचा ‘दबाव’
Just Now!
X