राज्यातील पाणी टंचाईच्या झळा नवी मुंबईकरांना चांगल्याच बसू लागल्या असून पालिकेने पाणी बचतीच्या अनेक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नुकतेच पाणी बचतीच्या जर्मन उपकरणाचे प्रात्यक्षिक व सादरीकरण पाहिले असून उपकरणाची चाचपणी करण्याचे आदेश पाणी विभागाला दिले आहे. त्यानुसार पालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात या उपकरणांची चाचपणी पुढील दहा दिवस होणार आहे. त्यानंतर पालिका या जर्मन उपक्रमाबाबत निर्णय घेणार आहे. नळांना हे यंत्र बसविल्यानंतर पाण्याचा दाब कमी होऊन ते हळूवार वितरीत होत असल्याने ५० टक्यापेक्षा जास्त पाण्याची बचत होत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
जलसंपन्न पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत अभूतपूर्व पाणी टंचाई सुरु झाली आहे. नागरी वसाहतीत दिवसातून एक वेळ पाणी पुरवठा केला जात असून एमआयडीसी भागात तर आठवडय़ातून तीन दिवस पाणी पुरवठा होत आहे. मोरबे धरणातील पाणीसाठय़ाची क्षमता लक्षात घेऊन पालिकेने नोव्हेबर मध्येच जल है तो कल है म्हणत पाणी बचतीची जनजागृती सुरु केली होती. त्यामुळे सध्या तीस टक्के पाणी कपात असून ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका सध्या विविध पातळीर पाणी बचतीच्या उपाययोजना करीत असून नुकतीच जर्मनी येथील निओपर्ल या कंपनीने बनविलेल्या छोटय़ा छोटय़ा चकत्यांची पाहणी आयुक्त वाघमारे यांनी केली. यावेळी निओपर्लचे अधिकारी व भारतीय विक्रेते सरीन इंड्रस्ट्रिजचे संचालक देखील उपस्थित होते. एका मनिटात हात धुण्यासाठी लागणाऱ्या एकूण पाण्यापैकी ८० टक्के पाणी हे विविध आकाराचे हे उपक्रम बसविल्यानंतर कसे वाचत असल्याचे सादरीकरण दाखविण्यात आले. पाणी बचतीचे सर्व उपाय स्विकारणाऱ्या आयुक्तांनी प्रथम पालिकेच्या वाशी येथील रुग्णालयातील नळांना हे यंत्र दहा दिवस लावून पाण्याची किती बचत होते ते पाहिले जाणार आहे. त्यानंतर किमान पालिकेचे प्रभाग अधिकारी शाळा, मुख्यालय या इमारतीत हे उपकरण बसविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नवी मुंबईकरांनी हे उपकरण बसवून पाणी बचतीला सहकार्य करावे असे आवाहन गणेश नाईक व महापौर सुधाकर सोनावणे यांनी केले आहे.