उलवा टेकडीची उंची कमी करण्यात येत असतानाच धावपट्टीचेही काम सुरू करण्याचा सिडकोचा निर्णय

प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर त्यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे लांबणीवर पडत असल्याने संपूर्ण स्थलांतरावर अवलंबून न राहता मुख्य गाभा क्षेत्रातील धावपट्टीच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला याबाबत विचारणा करण्यात आली आहे. सिडकोने उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाला गती दिली असून दक्षिण बाजूला ही उंची साडेपाच मीटपर्यंत कमी करण्यात आली आहे. या बाजूने विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाला सुरुवात करणे शक्य असल्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे.

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून सिडकोने नवी मुंबई विमानतळाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. सोळा हजार कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला विमानतळपूर्व कामे करून देण्यासाठी सिडकोने दोन हजार कोटी रुपये खर्चाची कामे मागील वर्षी सुरू केली असून त्यांनी गती घेतली आहे. यात उलवा टेकडीची उंची कमी करण्याचे महत्त्वाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळासाठी सिडकोला एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार असून त्यातील ११६१ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. या प्रकल्पाला अडथळा ठरू पाहणाऱ्या १० गावांतील ६७१ हेक्टर जमीनही महत्त्वाची आहे. त्यासाठी सिडकोने या प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वोत्तम पॅकेज दिलेले आहे. त्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या छोटय़ा-मोठय़ा २१ मागण्या प्रंलबित होत्या. त्या सोडविण्यात माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आणि भूषण गगराणी यांनी प्राधान्य दिलेले आहे. काही वैयक्तिक मागण्या वगळता आता सर्व मागण्या मान्य झालेल्या असताना प्रकल्पग्रस्त गावे खाली करून देण्यास चालढकलपणा करीत आहेत. तीन हजार प्रकल्पग्रस्तांपैकी केवळ एक हजार प्रकल्पग्रस्तांनी घरे स्वत:हून खाली करून दिलेली आहेत. शिल्लक दोन हजार प्रकल्पग्रस्त आज-उद्या करून चालढकलपणा करीत आहेत. यात काही प्रकल्पग्रस्त नेत्यांची विनाकारण त्यांना फूस आहे. त्यात आता पावसाळा व मुलांची शाळा सुरू झाल्याने हे स्थलांतर लांबणीवर पडत आहे. पुढील महिन्यात मुख्य कंत्राटदार कंपनीला सर्व जमीन हस्तांतरित करून देण्याची अट होती. प्रकल्पग्रस्त गाव रिकामे करीत नसल्याने सिडको हे हस्तांतरण करू शकेल का याबाबत साशंक आहे. त्यावर उपाय म्हणून प्रकल्पाचे काम कुठेही थांबता कामा नये यासाठी उलवा टेकडीच्या दक्षिण बाजूस मुख्य धावपट्टीच्या बांधकामास सुरुवात करण्याची सूचना केली जाणार आहे. या बाजूच्या गावातील प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर केले असून धावपट्टीच्या कामास सुरुवात करण्यास हरकत नसल्याचे दिसून येते.

नवी मुंबई विमानतळाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळचे नियोजन केले गेले आहे. त्यात पुढील महिन्यात सर्व गावे खाली होतील असे अपेक्षित होते पण तसे न झाल्यास मुख्य काम न थांबविता धावपट्टीच्या कामाला एकीकडे सुरुवात करण्याचा सिडको प्रशासन विचार करीत आहे. तसा प्रस्ताव बांधकाम कंपनीला देण्यात आला आहे. असे केल्याने प्रकल्पाच्या कामाची गती कायम राहणार आहे. – प्राजक्ता लवंगारे वर्मा, सहव्यवस्थापकीय संचालिका, सिडको.