23 October 2020

News Flash

तीन महिन्यांत आरोग्य सुविधांचा कायापालट

खाटांची संख्या ६,६०६; करोना योद्धय़ांची अविश्रांत सेवा

खाटांची संख्या ६,६०६; करोना योद्धय़ांची अविश्रांत सेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील पालिकेच्या आरोग्य सेवेबाबत असलेली नाराजी करोनाकाळात दूर होत असल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यांत आरोग्य सुविधांत दुपटीने वाढ करण्यात पालिका प्रशासन यशस्वी झाले आहे. ३ हजार ३०७ असलेली खाटांची संख्या आता ६ हजार ६०६ पर्यंत गेली तर मृत्युदर ३.२५ वरून २ टक्केपर्यंत खाली आला आहे.

नवी मुंबईत १३ मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण सापडला. हळूहळू बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत गेली. मात्र आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत गेल्या. खाटांची संख्या कमी पडत असल्याने यासाठी रुग्णांची वणवण होत होती. १४ जुलै रोजी पालिका आयुक्तपदाचा पदभार अभिजित बांगर यांनी घेतल्यानंतर आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

१४ जुलै रोजी शहरात ९९१७ करोनाबाधित होते, तर ३१० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यात अत्यवस्थ रुग्णांसाठी आरोग्य सुविधा कमी पडत होत्या, तर करोना चाचण्यांची शहरात व्यवस्था नसल्याने अहवाल मिळण्यात विलंब होत होता. त्यामुळे करोना संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह मिळण्यासाठी नातेवाईकांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र होते.

अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम आरोग्य सुविधांत कायापालट केला. यात दुपटीने वाढ करण्यात आली असून पालिकेच्या ‘डॅश बोर्डवर’ उपलब्ध खाटांची माहिती एका क्लिकवर मिळत आहे.

करोना मृत्यूचा दर हा तीन टक्केच्या वर होता तो दोन टक्केपर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयावरही वचक ठेवण्याचे काम करण्यात आले असून सामान्य नागरिकांचे उकळलेली सव्वा कोटींची अतिरिक्त देयके परत करण्यात आली आहेत. शिस्त न पाळणाऱ्यांवरही पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे आता करोनाकाळात मिळत असलेल्या आरोग्य सुविधांबाबत नागरिक पालिकेचे कौतुक करताना दिसत आहेत.

आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता सुरेंद्र पाटील, उपायुक्त अमरीश पटनिगिरे यांसह अनेक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सलग तीन महिने एकही दिवस सुट्टी न घेता काम केले आहे.

आरोग्य सुविधांची बदललेली स्थिती 

                                    १४ जुलै       १४ ऑक्टोबर

साध्या खाटा                        २४८९         ३३७

प्राणवायू खाटा                    ६५२          २७३०

अतिदक्षता खाटा                 १६१          ४४३

कृत्रिम श्वसन यंत्रणा             ६८          १६३

एकूण  खाटा                       ३३०७         ६६७३

मृत्युदर                               ३.२५        २.०

करोनामुक्तीचा दर            ६० %  ८    ९.५८

रुग्णदुपटीचा काळ        ६८ दिवस       १०१ दिवस

चाचण्या (परमिलियन)      १६४           ७७९

करोनाबाधित रुग्ण            ९९१७        ४०,६३९

उपचाराधीन रुग्ण              ३५३५         ३४१०

करोना मृत्यू                      ३१०          ८२३

प्रस्तावित खाटा

१०००  साध्या खाटा

१२५ अतिदक्षता खाटा : विमा रुग्णालय, वाशी

७५ सिडको प्रदर्शनी केंद्र करोना रुग्णालय

पदभार हाती घेतल्यानंतर करोनावर नियंत्रण हेच लक्ष ठेवले आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात आरोग्य सुविधा वाढवल्या आहेत. नागरिकांचे सहकार्य मिळत असून एकजुटीने करोनावर मात करणे शक्य आहे. आरोग्य सुविधांची सर्व माहिती पालिकेच्या डॅश बोर्डवर मिळत असून करोनास्थिती नियंत्रणात आहे.

 –अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:51 am

Web Title: navi mumbai municipal administration succeeded to double health facilities zws 70
Next Stories
1 हिरवी मिरची महागली
2 विजेविना जनजीवन ठप्प
3 शहरबात :  करोनाकाळातील क्रिकेटप्रेम?
Just Now!
X