४८२५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

करोना आपत्तीमुळे वाढलेला खर्च व ढासळलेले उत्पन्न अशी परिस्थिती असताना नवी मुंबई महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षांचा ४ हजार ८२५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी मंजूर केला. चालू आर्थिक वर्षांच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पात २२५ कोटींची वाढ झाली आहे. असे असले तरी नव्या आर्थिक वर्षांत नवी मुंबईकरांसाठी कोणत्याही नव्या मोठय़ा प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली नाही. जुन्याच रखडलेल्या प्रकल्पांच्या पूर्ततेवरच भर देण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईकरांच्या कोणत्याही करात वाढ करण्यात आलेली नाही.

नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासून शहरातील करोना रुग्णवाढ व मृत्युदर कमी करण्याचे आव्हान घेऊन आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेले अभिजीत बांगर यांनी जुन्या प्रकल्पांना चालना देण्याचा निश्चय केल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या पुढील महिन्यात होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकविण्यासाठी आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पर्यावरणविषयक गृहसंकुले, सौर उर्जा, पाण्याचे पुनर्वापर, पर्यावरण प्रयोगशाळा, प्राणवायू पार्क, बायो गॅस प्रकल्प आणि माझी वसुंधरा या प्रकल्पां व्यतिरिक्त आयुक्तांनी मोठय़ा प्रकल्पाची घोषणा करणे टाळले आहे. आरोग्य सेवा मजबूत करण्याचे लक्ष मात्र ठेवण्यात आले आहे.

राज्यातील इतर पालिकांच्या तुलनेत मुंबईनंतर नवी मुंबई पालिका ही एक श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जात आहे. सिडकोने पायाभूत सुविधांच्या पायावर पालिकेने सेवेचा कळस चढविला असल्याने आता त्या सुविधांची देखभाल करणे हे पालिकेसमोर आव्हान आहे. शहरातील नागरिक हे मध्यमवर्गीय असून सरासरी उत्पन्न हे १५ ते २० हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे कर देणाऱ्यांची संख्या जास्त असून पालिकेने केवळ करातून पुढील वर्षी ६०० कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आठशे कोटी जमेतून सुरू झालेली ही पालिकेची जमा आता पाचपट वाढली आहे. त्यामुळे पालिकेने मुख्यालय, वंडर पार्क, शास्त्रोक्त पद्धतीची क्षेपणभूमी, पाचशे किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे सिमेंट क्राँक्रीटीकरण, मोरबे धरण यासारखे आर्थिकदृष्टय़ा मोठे व महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले आहेत. पालिका आयुक्त बांगर यांनी सादर केलेल्या पहिल्याच अंदाजपत्रकात मोठे प्रकल्प हाती न घेता पर्यावरण विषयाला महत्त्व दिले आहे. महामुंबई क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय हवा शुद्धता कार्यक्रम राबविताना पाणी व हवा प्रदूषण तपासण्याकरिता आधुनिक प्रयोगशाळा उभी केली जाणार आहे.

नवी मुंबई :  पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा नवी मुंबई पालिकेतल्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून ३ हजार ८५० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्याला स्थायी समिती व महासभेत वाढ करीत तो ४ हजार ६०० कोटींचा अंतिम करण्यात आला होता. बांगर यांनी या वर्षीचा अर्थसंकल्प हा ४ हजार ८२५ कोटींचा मंजूर केला असून  गेल्यावर्षी पेक्षा या अर्थसंकल्पात २२५ कोटींची वाढ झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासकीय राजवट असल्याने महासभा तसेच स्थायी समिती नसल्यामुळे गुरुवारी मांडलेला अर्थसंकल्पच अंतिम असणार असून त्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. पालिका निवडणुका तोंडावर असताना यात आरोग्य व शिक्षण विभागासाठी जास्त तरतूद केली असून काही मोजकेच नवीन प्रकल्प यात समाविष्ट केले आहेत.

या वेळी आयुक्तांनी नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ करण्यात आली नसून नवी मुंबईकरांच्या हितासाठी भविष्याचा विचार करता हा अर्थसंकल्प भौतिक व नागरी सुविधा देण्याबरोबरच आरोग्य, शिक्षण, परिवहन याला महत्त्व दिले असल्याचे या वेळी सांगितले. मात्र विद्यमान प्रकल्पांनाच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट या अर्थसंकल्पात मांडलेले दिसत आहे.

करोनामुळे या वर्षी पालिकेचे उत्पन्न घटले आहे. करापोटी मिळणारे उत्पन्नही या वर्षी कमी झाले आहे. त्यामुळे विविध माध्यमांतून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने नियोजन केले

आहे. त्यात पालिका कामकाजात ‘ई गव्हर्नस’चा प्रभावी वापर कारभार गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शक करण्यात येईल, असा विश्वास या वेळी आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

करोनाच्या संकटामुळे आरोग्य तसेच शिक्षण व पायाभूत सुविधांवर अधिक भर दिला असून अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ४९९.४१ कोटी इतकी मोठी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यात १८० कोटींची वाढ करण्यात आली आहे. तसेच शहरात शिक्षण व पायाभूत सुविधांवरही अधिक खर्च केला जाणार आहे. नवी मुंबई परिवहन उपक्रमासाठी पालिकेकेडून १५० कोटींचे अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

जुन्या प्रकल्पांना गती

* विज्ञान केंद्राची निर्मिती

* स्मार्ट पार्किंग पॉलिसी

नव्या प्रकल्पांची मुहर्तमेढ

* आंतरराष्ट्रीय तरणतलाव

* वाशी डेपोचा विकास  व वाणिज्य संकुलाची निर्मिती

* पुनर्विकास प्रकल्पांच्या मान्यतेसाठी सुलभीकरण

* सिडकोकडून ५२० तर  एमआयडीसीकडून २३३  भूखंडांचे हस्तांतरण

* सीसीटीव्ही यंत्रणा

* जनसायकल प्रणालीवर भर

* सक्षम अग्निशमन यंत्रणांसाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी

* ‘एनएमएमटी’च्या बस १००  टक्के सीएनजी व विद्युत बस

* नवे फलक धोरण

* ई गव्हर्नसचा प्रभावी वापर अंतर्गत रस्त्यांवर उड्डाणपूल

* घणसोली येथील आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल उभारणी

* झोपडपट्टी शून्य  कचरा प्रकल्प राबवणे

* मियावाकी फॉरेस्ट संकल्पना विस्तारित करणे

* दर्जेदार आरोग्यसेवांवर भर

* अपंगांकरिता २७५ स्टॉल्स

* उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी दोन वाहने खरेदी