नवी मुंबईकरांसमोर पुन्हा रुग्णवाढीचे संकट उभे ठाकले आहे. रुग्णांचा आकडा १५ हजारचा टप्पा गाठेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मृतांचा आकडा ४००पर्यंत आला आहे. घरीच अलगीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ८० हजारच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत स्वत: नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी १२ तास कामाला वाहून घेतले आहे. येत्या काळात रुग्णसंख्या वाढली तरी चालेल. पण, शहरातील मृत्यूदर शून्यावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असा निर्धार आयुक्त बांगर यांनी ‘लोकसत्ता’चे विशेष प्रतिनिधी विकास महाडिक यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यक्त केला.

* शहरात रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. हे कशामुळे?

नवी मुंबईत वैद्यकीय तपासण्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढत असल्याचे दिसून येत आहे. याआधी ५०० तपासण्या केल्यावर २०० ते २५० रुग्ण आढळून येत होते. आता दिवसाला दोन हजार तपासण्या केल्या जात आहेत. त्यात ३०० ते ३२५ रुग्ण सापडत आहेत. तुलनेने ही संख्या कमी आहे. तरीही नागरिकांच्या जास्तीत जास्त वैद्यकीय तपासण्या होणे आवश्यक आहे. येत्या काळात ही प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवावी लागणार आहे.

* नवी मुंबईसारख्या छोटय़ा शहरातही मृत्यूदर लक्षवेधी आहे.

मृत्यूदर रोखणे हेच आमच्या पुढील मोठे आव्हान आहे. मुख्यमंत्र्यांनीही हेच अधोरेखित केले आहे. त्यामुळे शहरातील रुग्णांच्या मृत्यूबाबतच्या कारणांचे रोज विश्लेषण केले जात आहे. त्यासाठी सायंकाळी डॉक्टर आणि संबधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. बैठकीत त्या दिवशी झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या मृत्यूचे अहवाल तपासून, ती व्यक्ती बाधित कधी झाली. त्याला असलेले इतर आजार, त्यावर केलेले औषधोपचार या सर्वाची मीमांसा केली जात आहे. मृत्यूदर रोखणे हेच आमचे पहिले लक्ष्य राहील.

* रुग्णसंख्या वाढीमागचे नेमके कारण काय?

रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेल्या तपासण्या हे आहेच. पण, बहुतेक नागरिक करोनाची लक्षणे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणजेच आजार अंगावर काढीत आहेत. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे यापैकी लक्षणे असली तरी ती लपवली जात आहेत. डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या एका बैठकीत ही गंभीर बाब पुढे आली आहे. करोना हा एखादा असाध्य आजार असल्याची भावना वाढीस लागली आहे. कोणतीही लक्षणे असली तरी तपासून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यातून रुग्ण बरा करणे सोपे जात आहे. आजार बळावल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक धावाधाव करीत असतात. सर्वसाधारण लक्षणे असली तरी तपासणी करण्यास काहीच हरकत नाही. नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे. करोना शरीराबाहेर आहे तोपर्यंत त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे आहे, पण त्याने शरीरात प्रवेश केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या आणि इतर आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करताना कठीण गोष्ट होऊन बसते.

* तपासण्या कधी थांबणार?

करोनाकाळातील वैद्यकीय तपासण्या ही एक निरंतर क्रिया आहे. शून्यावर संख्या येईपर्यंत ही क्रिया थांबणार नाही. उलट करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सर्वेक्षण, अलगीकरण आणि उपचार ही त्रिसूत्री पालिकेने ठरवली आहे. रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल. पण, मूत्यूदर शून्य करण्याचे आमचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. सर्वाना वैद्यकीय उपचार देण्यास पालिका प्रशासन कटिबद्ध आहे.

*  रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे, अशी स्थिती आहे का?

तपासण्या वाढल्या म्हणून रुग्णसंख्या वाढलेली आहे हे स्पष्ट आहे. अशा वेळी वैद्यकीय सुविधा उभारल्या जात आहेत. प्राणवायूची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना ‘इंडिया बुल्स’मध्ये विलगीकरण केले जात आहे. त्या ठिकाणी आणखी हजार ते दीड हजार नागरिकांची व्यवस्था केली जाणार आहे. शहरात इतर ठिकाणीही विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व सेवा-सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. प्राणवायू पुरवठा करण्याची सुविधा असलेल्या ५०० खाटा शहरात तयार केल्या जात आहेत. खासगी रुग्णालयांनी ही सुविधा वाढवावी, यासाठी संपर्क केला जात आहे. वाशीतील सिडकोच्या प्र्दशनी केंद्रात ५०० खाटा तयार आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात आणखी २०० खाटांची व्यवस्था केली जात आहे. सध्या २५ खाटा तात्काळ तैनात ठेवण्यात आल्या आहेत. अत्यवस्थ सेवा उभारताना डॉक्टर, इतर कर्मचारी आणि वैद्यकीय यंत्रणा यांची अडचण येत आहे. या ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी आवश्यक असतात. पालिकेला ही स्वतंत्र यंत्रणा उभारण्यास दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे.

* साथ कधीपर्यंत आटोक्यात येईल?

त्याविषयी स्पष्ट सांगता येणार नाही. पण, आम्ही प्रयत्न करीत आहोत. वैद्यकीय यंत्रणा आता थकली आहे. या कामात शिथिलता येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या जात आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांचे धैर्य टिकवून ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

* आणि टाळेबंदीविषयी काय?

करोनासोबत जगण्याचे आता निश्चित झाले आहे. केवळ प्रतिबंधित ठिकाणी टाळेबंदी कायम ठेवण्यात आली आहे. इतर ठिकाणी सर्व काळजी घेऊन व्यवहार सुरू आहेत.

– विकास महाडिक