|| संतोष जाधव

२००९ पासून पालिकेचे दुर्लक्ष, कोटय़वधींचा खर्च वाया

करावे येथील स्मशानभूमीत असणारी नवी मुंबई महापालिकेची एकमेव शवदाहिनी गेली नऊ वर्षे वापराविना पडून आहे. ही वाहिनी वापरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर होत असल्यामुळे ती वापरली जात नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दहन करताना होणारी वृक्षतोड आणि निर्माण होणारे वायू यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी ही शवदाहिनी धुळीत पडली आहे.

तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांनी खासदार निधीतून नवी मुंबई पालिकेला पहिली विद्युत शवदाहिनी दिली होती. करावे येथे ही दाहिनी ठेवण्यात आली आहे. शहरात एकूण २९ स्मशानभूमी आहेत. विजय नाहटा यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात स्मशानभूमी व्हिजन राबवून मूळ स्मशानभूमींचा कायापालट करण्यात आला होता. सुरुवातीला अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु नंतर पालिकेने करून मोफत अंत्यविधी पद्धत सुरू केली.

सव्वा कोटी रुपये खर्च करून विद्युत दाहिनीची सोय करण्यात आली, मात्र तिचा वापरच झालेला नाही. विद्युत शवदाहिनीत दहन करण्यासंदर्भात प्रबोधन झालेले नाही. त्यातच या दाहिनीसाठी  ७०० डिग्री तापमानाची गरज असते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात विजेचा वापर होतो. तसेच दाहिनीचा वापर करण्यासाठी काही तास आधीच ती सुरू करून ठेवावी लागते. त्यामुळे ती अद्याप धूळखात पडून आहे.

शहरात असलेली करावे येथील विद्युत शवदाहिनी सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सुरुवातीला नवी मुंबईतील एक सामाजिक संस्था ही दाहिनी चालवणार आहे. त्यानंतर ती पालिकेकडून चालवण्यात येईल. परंतु या ठिकाणी विजेऐवजी गॅसचा वापर केला जाणार आहे. याबाबत लवकरच आयुक्तांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. पालिका ही शवदाहिनी सुरू करणार आहे.    – मोहन डगावकर, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा

करावे येथे पालिकेने विद्युत शवदाहिनीची व्यवस्था केली आहे. परंतु ती वापराविना अनेक वर्षे पडूनच आहे. त्यामुळे या शवदाहिनीचा योग्य तो वापर करायला हवा.   – विनोद म्हात्रे, स्थानिक नगरसेवक