13 December 2017

News Flash

विकासासोबत उत्पन्नवाढ!

पाण्याची नासाडी करूनही महिन्याकाठी जेमतेम बिल भरणाऱ्या नागरिकांना या अर्थसंकल्पात दणका देण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: March 21, 2017 5:49 PM

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षांचे  अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडले. छायाचित्र: नरेंद्र वास्कर  

नवी मुंबई महापालिकेचा ३००० कोटींचा अर्थसंकल्प सादर; बहुमजली वाहनतळ, पादचारी सुविधांबरोबरच अनेक महत्त्वपूर्ण घोषणा

शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा वेग आणखी वाढवतानाच पालिकेच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी करून उत्पन्न वाढवण्याची हमी देणारा अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीसमोर सादर केला. नवी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा, शहरातील वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल १४ ठिकाणी बहुमजली वाहनतळांची उभारणी, घरापासून जवळच्या तीन किलोमीटर अंतरावरील प्रवासात वाहनांचा वापर कमी व्हावा यासाठी रहिवाशांना अडथळामुक्त पायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे, ठाणे-बेलापूर रस्त्यास समांतर अशा घणसोली ते ऐरोली पाम बीच मार्गाचा विकास करणे तसेच वाशी आणि नेरुळ येथे कृत्रिम चौपाटीची उभारणी अशा विविध लोकोपयोगी योजनांचा समावेश करणारा आणि आर्थिकदृष्टय़ा डबघाईस आलेल्या महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी कठोर उपायांची आखणी करणारा २०१७-१८ साठीचा २,९९८ कोटी ४७ लाख रुपयांच्या जमा-खर्चाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी सादर केला.

पाण्याची नासाडी करूनही महिन्याकाठी जेमतेम बिल भरणाऱ्या नागरिकांना या अर्थसंकल्पात दणका देण्यात आला आहे. दिवसाला एक हजार लिटरपेक्षा अधिक पाणी वापरणाऱ्या पाच जणांच्या कुटुंबाला यापुढे घसघशीत पाणी बिल भरावे लागेल, असे प्रस्तावित आहे. याउलट पाच जणांचे एखादे कुटुंब पाण्याचा वापर दिवसाला ३५० लिटपर्यंत (प्रति माणसी ७० लिटर) मर्यादित ठेवत असेल तर अशा कुटुंबांना प्रति हजार लिटर अवघा एक रुपया इतका पाण्याचा दर आकारला जाणार आहे. ऐरोली, घणसोली, दिघा या उपनगरांनाही मोरबे धरणाचे पाणी मिळावे यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

नियोजनबद्ध शहर अशी ख्याती असलेल्या नवी मुंबईतील जवळपास सर्वच उपनगरांमध्ये वाहनतळांचा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सिडकोकडून हस्तांतरित झालेल्या ४४ रिक्षा, टॅक्सी तळांच्या आरक्षित भूखंडांचा विकास तसेच १४ ठिकाणी बहुमजली वाहनतळांच्या विकासाचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. हे सर्व प्रकल्प खासगी लोकसहभागातून उभारले जातील, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. याशिवाय घनकचऱ्यापासून विद्युतनिर्मिती करण्यासाठी आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १८० कोटी रुपयांचा नवा प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आले आहे. तुर्भे येथील कचराभूमीच्या विस्ताराचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.

लोकप्रतिनिधींना टोला

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी ठरलेले आयुक्त मुंढे यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींना अप्रत्यक्ष टोला लगावला. ‘हम तो फुलो की तरह अपनी आदत से मजबूर है। तोडनेवालोंको भी खुशबू देते है’ अशा काव्यपंक्ती ऐकवत मुंढे यांनी नगरसेवक निधी ५० लाख रुपये केल्याचे जाहीर केले. आयुक्तांना प्रत्येक बाबतीत विरोध करणारे नगरसेवक निधीवाढीलाही विरोध करतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

नव्या उद्यानांची उभारणी

उद्यानांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईत घणसोली विभागात आठ भूखंडांवर नवीन उद्याने विकसित केली जाणार असून तुर्भे विभागात सुमारे ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर ‘बॉटनिकल गार्डन’ उभारण्याचे या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. सानपाडा भागात सेक्टर १० येथे १० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर मानवाची पंचेंद्रिये या संकल्पनेवर आधारित उद्यान विकसित केले जाणार आहे. घणसोली विभागात पाळीव प्राणी क्षेत्र, रॉक क्लायम्बिंग, सायकल ट्रॅक, स्केटिंग पार्कची सुविधा असणाऱ्या उद्यानांची उभारणी या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. पर्यावरणाधारित पर्यटनाला चालना मिळावी यासाठी ऐरोली आणि घणसोली भागांत तिवर उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पांसाठी ७७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

उत्पन्नवाढीचे आव्हान

  • ठोस आर्थिक नियोजन नसतानाही कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प सुरू केल्यामुळे काही वर्षांपासून आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेच्या तिजोरीत या वर्षी २६०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा करण्याचे आव्हानात्मक उद्दिष्ट यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे.
  • मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून नव्या वर्षांत या कराच्या माध्यमातून ८२५ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट आहे.
  • थकीत मालमत्ता कराची २०१५ मधील ५१५ कोटी रुपयांची, तर २०१६ मधील ७०५ कोटी रुपयांची वसुली होईल, असा अंदाज आहे.
  • या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा १८९ कोटी रुपयांची म्हणजे ३७ टक्क्यांची वाढ अपेक्षित धरली असून स्थानिक संस्था करातून गेल्या वर्षीच्या तुलनेत १४० कोटी रुपयांची वाढ आखण्यात आली आहे.

First Published on February 17, 2017 12:16 am

Web Title: navi mumbai municipal corporation budget 2017 nmt buses 2