टाळेबंदीआधीच्या मुखपट्टय़ा, हातमोजांचा तपशील सादर करण्याचे आदेश

मुंबई : सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून त्यांना असंवेदनशील परिस्थितीत काम करायला भाग पाडणाऱ्या नवी मुंबई पालिकेला उच्च न्यायालयाने धारेवर धरले. तसेच टाळेबंदीपूर्वी मुखपट्टय़ा, सॅनिटायझर, हातमोजे यांचा नेमका किती साठा होता याचा अचूक तपशील सादर करण्याचे बजावले आहे.

पालिकेच्या आरोग्यसेवकांना विशेषत: घनकचरा विभागात काम करणाऱ्या ३२६१ कामगारांना आतापर्यंत किती वेळा सुरक्षिततेच्या सामग्रीचे वितरण केले याची आकडेवारीही सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांनी पालिकेला दिले.

समाज समता कामगार संघातर्फे करण्यात आलेल्या याचिकेमध्ये पालिकेचे ६२७७ कर्मचारी अत्यंत असंवेदनशील परिस्थितीत काम करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यातील ३२६१ कर्मचारी हे घनकचरा व्यवस्थापन विभागातील असून दररोज ते मुखपट्टय़ा, हात-पायमोजांशिवाय सफाईचे काम करतात. एवढेच नव्हे, तर त्यांना हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध केले जात नाही. तसेच कामापूर्वी आणि कामानंतर त्यांच्या हातावर केवळ दोन ते तीन थेंब सॅनिटायझर दिले जाते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. ६८३ कामगारांपैकी काही रुग्णालयात, काही शहर आरोग्यपदावर कार्यरत आहेत, तर काही स्मशानभूमीत सफाईचे काम करतात. हे सगळे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडतात आणि त्यांना नेमून दिलेले काम दररोज करत असतात. तरीही त्यांना करोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक ती सामग्री उपलब्ध केली जात नसल्याचेही याचिकेत म्हटले आहे.