खासगी डॉक्टर, दवाखान्यांवर रुग्णशोधाची जबाबदारी

नवी मुंबई : करोना साथरोगाची सर्वात जास्त शक्यता अन्य आजार असलेल्या (कोमॉर्बिड) रुग्णांना असल्याने नवी मुंबई पालिकेने शहरातील अशा रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. पालिकेने आजवर साडेचार हजार रुग्णांची नोंद केली आहे. त्यासाठी या आजारांची इत्थंभूत माहिती मिळविण्याची जबाबदारी स्थानिक खासगी डॉक्टर, दवाखाना आणि औषधालयांतील (मेडिकल स्टोअर) यांच्यावर टाकण्यात येणार आहे. त्यांच्याकडून अहवाल मागविले जाणार आहेत. काही रुग्ण इतर आजारांची माहिती देण्यास चालढकल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी मुंबईतील रुग्णांची संख्या २० हजारांच्या घरात गेली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला प्राणवायू आणि अत्यवस्थ सेवेसाठी लागणाऱ्या अतिदक्षता खाटांची कमतरता भासू लागली आहे. यासाठी खासगी रुग्णालयांशी करार केले जात आहेत. राज्य सरकारने खासगी रुग्णालये आवश्यकेतनुसार ताब्यात घेण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्याचा उपयोग करून पालिका शहरातील आवश्यक रुग्णालये ताब्यात घेणार आहे. यात प्राणवायू आणि अत्यवस्थ सेवेची तरतूद असेल. पालिकेने प्राणवायू खाटा तयार ठेवल्या आहेत. त्यांची संख्या अतिरिक्त आहे. या साथरोगाची सर्वाधिक लवकर लागण ही  इतर आजार असणाऱ्या रुग्णांना होत असल्याचे आढळून आले आहे. यात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांचा समावेश आहे.

अशा रुग्णांनी पुढे येऊन चाचणी करून घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रतिजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, असे रुग्ण स्वत:हून चाचणी करण्यास घाबरत आहेत. अनेक नागरिक प्राथमिक लक्षणे असतानाही ती लपवत असल्याचे दिसून आले आहे.  सर्दी-खोकला, ताप ही प्रमुख लक्षणे नसलेले कोमॉर्बिड रुग्ण तपासण्या घेण्यास टाळाटाळ करीत आहेत.

रुग्णांचा अहवाल मागविणार

आजारांसाठी ते स्थानिक रुग्णालयात उपचार वा औषधे खरेदी करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने या रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी स्थानिक नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून स्थानिक डॉक्टर, रुग्णालये व औषधांच्या दुकानातून ‘कोमॉर्बिड’ रुग्णांचा अहवाल मागविणार आहे. त्यामुळे या रुग्णापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. करोना आजार शरीरात प्रवेश करेपर्यंत त्याच्यावर उपचार करणे सोपे जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अगोदरपासूनच इतर आजार असलेल्या रुग्णांची यादी तयार करण्याचे काम पालिकेने सुरू केले असून मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात साडेचार हजार इतर आजारांचे रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या यापेक्षा तिप्पट असून सर्वेक्षणाचे काम कायम आहे. त्यांच्यापर्यंत पालिकेचे आरोग्य पथक लवकरच पोहोचणार आहे.