बुधवारचा दिवस नवी मुंबईकरांसाठी तापदायक ठरला आहे. सायन- पनवेल महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे रुळाला तडे गेल्याने पनवेल – सीएसटीएम वाहतूक विस्कळीत झाली. यात भर म्हणजे वाशीत वाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.

नवी मुंबईत बुधवारी वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. पावसामुळे सायन पनवेल महामार्गावर खड्डे पडल्याने पहाटेपासून वाहतूक कोंडी झाली. अर्धा तासाचा रस्ता पार करण्यास सुमारे दोन तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. तर रेल्वे प्रवाशांनाही मनस्तापाचा सामना करावा लागला. खारघर ते सीबीडी दरम्यान रुळाला तडा गेल्याने ऐन गर्दीच्या वेळी सीएसटीएम – पनवेल लोकल सेवा दोन तासापेक्षा जास्त वेळ ठप्प झाली. सकाळी अकरानंतर लोकल सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती रेल्वे तर्फे देण्यात आली.

यात भर म्हणजे वाशीत सकाळी वाहतूक पोलिसांनी रिक्षेत चौथा प्रवासी बसवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई सत्र सुरु केल्याने रिक्षा चालकांनी संप पुकारला. एनएमएनटीला अतिरिक्त गाड्या सोडता येत नव्हत्या. त्यामुळे वाशी स्टेशनवरून अन्य उपनगरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.