दिघ्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी माजी मंत्री गणेश नाईक यांनी कारवाई करण्यात आलेल्या इमारतींमधील बेघर रहिवाशांना भरपाई मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचे आश्वासन रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात दिले. दिघ्यात बेकायदा बांधकामे उभी राहण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळकेश्वर मंदिराजवळ पक्षाचा मेळावा झाला. या वेळी मार्गदर्शन करताना नाईक यांनी विरोधकांवर टीका केली. दिघ्यातील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांवर बेकायदा बांधकामप्रकरणी पद रद्द होण्याची टांगती तलवार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत सत्तेत येण्याचे स्वप्न विरोधकांनी भरदिवसा पाहू नये. हे त्यांचे स्वप्न कधीही सत्यात उतरणार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
मुख्यमंत्र्यांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची घरे अधिकृत करण्याची घोषणा विधिमंडळात केली. याबाबतचे धोरण न्यायालयात सादर केले; परंतु ते टिकू शकले नाही. सरकार नागरिकांसाठी काही तरी करीत असल्याचे भासवत आहे; पण ही निव्वळ धूळफेक आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेत आहेत, हे कोणीही दाखवून द्यावे, याच वेळी नवी मुंबईतील कोणत्या समस्या सोडवल्या, हे खुद्द शिंदे यांनी सांगावे, अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले.