सल्लागाराची नेमणूक

नवी मुंबई : सुरक्षेसाठी शहरांत सीसीटीव्ही बसविण्याचे काम लालफितीत अडकले आहे. सुरुवातीला १५५ कोटींची निविदा २७१ कोटींपर्यंत गेल्याने टीका होऊ लागल्यानंतर प्रशासनाने ती निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. आता नव्याने ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने शासनमान्य ‘ईएनवाय’ या सल्लागाराची नेमणूक केली आहे.

शहरातील मुख्य ठिकाणी सध्या २७२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु शहरातील सर्वच विभागांत महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी १५४ कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे ठरविण्यात आले आहे. परंतु मागील सर्व निविदा प्रक्रिया या ‘तारीख पे तारीख’ करीत सात वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.  ७ वेळा मुदतवाढ दिल्यानंतर ३ निविदा प्राप्त झाल्या.

त्यातील दोन निविदाकार अपात्र ठरले तर या कामासाठी १५५ कोटी कामासाठी २७१ कोटी रुपयांची निविदा राहिली. पालिकेने दर कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु सुरुवातीला २५१ त्यानंतर २४१ कोटींपर्यंत दर कमी करण्यात आले. मात्र १५५ कोटींची निविदा २७१ कोटींवर गेल्याने यावर मोठी टीका झाली. त्यामुळे वाद वाढल्याने ही प्रक्रियाही रद्द करण्यात आली.

आता या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून त्यासाठी शासनमान्य असलेल्या ईएनवाय सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या सल्लय़ानुसार पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.