पालिका व सिडकोच्या हलगर्जीमुळे कादंळवनांवर बेकायदा भराव

होल्डिंग पाँडवर डेब्रिजचा भराव टाकून, ते बुजवून मैदान तयार करण्यात येत असल्यासंदर्भात वन विभागाने नऊ महिन्यांपूर्वी पाठवलेल्या पत्राला पालिका आणि सिडकोने वाटाण्याच्या अक्षता टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

नेरुळ येथे असलेले होल्डिंग पाँड डेब्रिजने बुजवून तिथे मैदाने तयार करण्यात आले आहे. जुईनगर रेल्वे कॉलनीच्या मागील भागात असलेल्या उच्चदाब वीजवाहिन्यांलगत असलेल्या कांदळवनावर हजारो गाडय़ा डेब्रिज टाकून कादंळवनांचे नुसकान करण्यात आले आहे. तिथे क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूलाच एक लोखंडी फाटक बनवले आहे. डेब्रिजचे डंपर जाण्यासाठी ते उघडले जाते व नंतर बंद केले जाते. नवी मुंबईत रात्री व  पहाटे वाशी व ऐरोली पुलावरून मोठय़ा प्रमाणात डेब्रिज भरलेली वाहने येतात.

होल्डिंग पाँडवर डेब्रिज टाकण्यात येत असल्याचे वन विभागाने नऊ महिन्यांपूर्वीच नवी मुंबई महापालिकेला व सिडकोला कळवले होते. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पालिकेच्या डेब्रिज विरोधी भरारी पथकालाही हे डेब्रिजचे ढिगारे दिसले नाहीत.

भरारी पथक निद्रिस्त

शहरात डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने डेब्रिजविरोधी भरारी पथके तयार केली आहेत. होिल्डग पाँड, कांदळवने आणि मैदानांतही डेब्रिजचे हजारो ट्रक रिते होत असताना ही पथके मात्र निद्रिस्त आहेत. गेल्या वर्षभरात या पथकांनी डेब्रिडच्या अवघ्या ६८ गाडय़ांवर कारवाई केली. आहे. त्यामुळे आयुक्तांनी या भरारी पथकाला अधिक सजग करणे आवश्यक आहे.

 

डेब्रिज टाकणाऱ्यांना रोखण्यासाठी नेरुळ येथील होल्डिंग पाँडच्या मार्गावर चर खोदला आहे. लोखंडी दरवाजा लावला आहे. पाहणी करून कारवाई करण्यात येईल. वन विभागाने दिलेल्या पत्राबाबत अधिक माहिती घेण्यात येईल.

– तुषार पवार, उपायुक्त, उद्यान

नेरुळ येथील होल्डिंग पाँडचा परिसर तसेच रेल्वे कॉलनीमागील कांदळवनाचा परिसर वन विभागाकडे नाही. डेब्रिजबाबत पालिका, सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.

– पी. आर. चौधरी, वन विभाग अधिकारी

सिडकोने हे पाँड पालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. डेब्रिज टाकून मैदाने होत आहेत, हे दुर्दैवी आहे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. होल्डिंग पाँडमधील डेब्रिज काढून पाँड पूर्ववत करावा.

– संदीप ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते