20 November 2017

News Flash

मान्सूनपूर्व कामांना २५ मेपर्यंतची मुदत

नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या

प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: May 13, 2017 12:56 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे आदेश

कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे पूर्वतयारी महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने सर्व प्राधिकरणांनी पावसाळ्यात सतत सतर्क राहावे व आपत्ती प्रसंगात परस्परसंवाद ठेवावा, अशी सूचना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी शुक्रवारी केली. महापालिकेसह सर्व प्राधिकरणांनी पावसाळापूर्व कामांचे नियोजन करावे व २५ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी या समितीचे सदस्य असलेल्या महापालिका क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय प्राधिकरणांच्या पावसाळापूर्व कामांचा व नियोजनाचा आढावा घेतला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकुश चव्हाण यांनी महानगरपालिकेने केलेल्या पावसाळापूर्व कामांचे सादरीकरण केले. पूर्वानुभव लक्षात घेऊन पाणी साचण्याच्या तसेच दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. आवश्यक ती दक्षता घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व रुग्णालयांत पुरेसा औषधसाठा असल्याची खात्री करून घेणे, धारण तलावांची सफाई, फ्लॅपगेट दुरुस्ती, आवश्यकतेनुसार वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण अशी कामे केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आढावा घेताना पावसाळापूर्व नाले व गटार सफाई कामे २५ मेपर्यंत पूर्ण करण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे. त्यासाठी संबंधित विभागाच्या विभाग अधिकाऱ्यांनी या कामांवर दैनंदिन देखरेख ठेवावी. प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेल्या उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही याकडे नियमित लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या. रस्त्यांवरील खोदकामे बंद करून रस्त्यांच्या पुनर्पृष्ठीकरणाची कामेही २५ मेपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश दिले.

महापालिकेसह सर्वच प्राधिकरणांनी आपापल्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात २४ तास योग्य माहिती असलेले कर्मचारी उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. कक्षात उपलब्ध असलेल्या साहित्याची तपासणी करून घ्यावी, असे आयुक्तांनी सूचित केले. सर्व प्राधिकरणे, स्वयंसेवी संस्था, मंडळे, पोहणाऱ्या व्यक्ती, विविध प्रकारचे मदतकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचे संपर्क क्रमांक एकत्रित करून त्याची सूची अद्ययावत करावी आणि सर्वाना वितरित करावी. ही सूची महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पावसाळी कालावधीत खदाण क्षेत्रात पाणी साचून त्या ठिकाणी जीवितहानी होण्याचा धोका लक्षात घेऊन तेथे संबंधित प्राधिकरणाने धोक्याच्या सूचनेचे )फलक लावावेत. अनेक ठिकाणी उघडय़ा वीजवाहिन्या आणि उघडी रोहित्रे आहेत, त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. या वेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त सेवा रमेश चव्हाण, परिमंडळ उपआयुक्त अमरीश पटनिगिरे व दादासाहेब चाबूकस्वार, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त तुषार पवार, एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, मध्य रेल्वेचे सीनिअर सेक्शनल अभियंता आर. के. देवांद, एमटीएनएलचे उपमहाव्यवस्थापक राजाराम, सिडकोचे पर्यवेक्षक अभियंता नितीन देशपांडे, वाहतूक पोलीस साहाय्यक आयुक्त पी. जी. माने, आरटीओचे सचिन पाटील, एमआयडीसीचे अभियंता प्रकाश चव्हाण व एस. पी. आव्हाड, होमगार्डचे अजय गुरव तसेच विविध मोबाइल कंपन्यांचे प्रतिनिधी व महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

समाजमाध्यमांचाही वापर करण्याची सूचना

पावसाळी कालावधीत नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना करीत आयुक्तांनी आवश्यकतेनुसार एसएमएस ब्लास्टिंगद्वारेही संदेशवहन करावे, असे सूचित केले. याकरिता कमीत कमी कालावधीत अनेक लोकांपर्यंत सुरक्षा संदेश पोहोचविण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे त्यांनी उपस्थित मोबाइल कंपनी प्रतिनिधींना आवाहन केले.

आठही विभाग कार्यालयांत आपत्ती व्यवस्थापन केंद्र

महापालिका मुख्यालयात वर्षभर २४ तास सुरू असलेल्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राव्यतिरिक्त बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांतही १ जूनपासून आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालयांत २५ मेपासून विभागीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. या सर्वच ठिकाणी आवश्यक साधनसामग्री, उपकरणांसह मदतकार्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे.

First Published on May 13, 2017 12:56 am

Web Title: nmmc commissioner dr ramaswamy n monsoon works monsoon works deadline