दिवसाला एक हजापर्यंत चाचण्या

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई :नवी मुंबईत शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पालिका प्रशासनाने येत्या काळात  शहरातील कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि  अतिदक्षता खाटांची संख्या  वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिदक्षता विभागातील ४०० अतिरीक्त खाटा, १६० कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि दिवसाला एक हजापर्यंत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

सध्या शहरातील रुग्णालयांमध्ये मिळून २४५ अतिदक्षता खाटा ८७ कृत्रिम श्वसन यंत्रणा कार्यान्वित आहेत. यातील ९० टक्के खाटा या भरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना एका रुग्णालयातून अन्य ठिकाणी हलविण्याची गरज निर्माण झाली आहे.

खाटांच्या उपलब्धतेसाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची फरफट होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. यावर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी शहरात कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप केला होता. याचवेळी नागरिकांना रुग्णालयांतील सुविधा तातडीने मिळवून देण्यासाठी पालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वयांवर भर देण्याची गरजही नाईक यांनी व्यक्त केली होती. शहरात प्रतिजन चाचण्या व स्वॅब चाचण्यांचा वेग वाढला असून त्यामुळे दिवसाला  अधिक खाटांची व्यवस्थाही वाढवणे क्रमप्राप्त झाले आहे.

अपेक्षित खर्च १०० कोटी

करोनासाठीचा खर्च १०० कोटी पालिकेने अपेक्षित धरला आहे. यात राज्य शासनाकडून दहा कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून आरोग्यसुविधांवर प्रचंड ताण असून करोनाच्या काळात खर्चाचा आकडाही मोठा होत असून पालिकेने करोनाचा अपेक्षित खर्च १०० कोटी असल्याची माहिती पालिकेच्या वित्त व लेखा विभागाने दिली.

राज्य शासनाकडून करोनासाठी मिळणारे अनुदान तसेच पालिका आवश्यक निधी कमी पडू देणार नाही. शहरात अधिक चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे.

-अभिजीत बांगर, पालिका आयुक्त

आजवर करोना

’ करोनामुक्त रुग्ण: ७९२५

’ नवे करोनाबाधित :३०३

’ एकूण बाधित : १२,२६९

’ आजचे मृत्यू : ६

’ एकूण मृत्यू  : ३५८

’ प्रलंबित चाचणी अहवाल : ३४९

’ उपचाराधीन रुग्ण : ३९८६