आठ दिवसांनंतर सेवा; ५० केंद्रांचे नियोजन

नवी मुंबई : लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका व खासगी अशी ५० लसीकरण केंद्र सुरू करण्याचे पालिका प्रशासनाने नियोजन केले असून आठ दिवसात निर्यातभवन येथे ‘जम्बो’ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या एकाच ठिकाणी ४ ते ५ केंद्र सुरू होणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. आता शहरात ३२ केंद्रांवर लसीकरण सुविधा मिळत आहे.

करोना लसीकरण सुरू झाल्यानंतर आतापर्यंत आरोग्य सेवकांसह इतर करोनायोद्धे व ज्येष्ठ नागरिकांना मिळून ४० हजार जणांना लस देण्यात आली आहे. १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना करोना लस देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे.

सध्या नवी मुंबईत महापालिकेची २१ तर खासगी ११ अशा  ३२ केंद्रावर लस दिली जात आहे. आणखी ५ खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे लसीकरणाची ३७ केंद्रे होणार आहेत. पालिका प्रशासनाने शहरात ५० केंद्रे तयार करण्याची तयारी ठेवली आहे.  त्याच प्रमाणे गुरुवारपासून पालिकेच्या तीन रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू करण्यात आली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तुर्भे येथील निर्यातभवनात पालिका प्रशासनाने जम्बो करोना काळजी केंद्र तयार केले होते. रुग्ण कमी झाल्याने ते सद्यस्थितीत बंद आहे. मात्र तेथील सर्व सुविधा अद्याप हलविण्यात आलेली नाही. त्यामुळे जास्ती जास्त नागरिकांना लसीकरण करण्यासाठी पालिका प्रशासनाने या केंद्रात जम्बो लसीकरण केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. या एकाच केंद्रात चार ते पाच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ापासून ही सेवा सुरू करण्यात येणार असून मनुष्यबळाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती लसीकरण प्रमुख डॉ.रत्नप्रभा चव्हाण यांनी दिली.

२४ तास सेवेला प्रतिसाद

नागरिकांना नोकरी, व्यवसायामुळे दिवसभर लसीकरण केंद्रांवर जाता येत नाही. यासाठी पालिका प्रशासनाने गुरुवारपासून वाशी, नेरुळ व ऐरोली येथील पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांत २४ तास लसीकरण सेवा सुरू केली आहे. या केंद्रांवर पहिल्याच दिवशी ८८३ जणांना लस देण्यात आली. यात वाशी रुग्णालयात २६७, नेरुळला ३४६ तर ऐरोली रुग्णालयात २७० जणांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे या रात्रसेवेचा यापुढेही नागरिकांना चांगला लाभ मिळणार आहे.

आशा, अंगणवाडी सेविका घरोघरी

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व नोंदणी प्रक्रिया नीट समजावी यासाठी पालिका प्रशासनाने आता आशा व अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी सोपवली आहे. त्या घरोघरी जात लसीकरणाची माहिती कुटुंबांना देणार आहेत व काही शंका असल्यास त्याच निरसन करणार आहेत.

लसीकरण मोहिमेला शहरात गती देण्यात आली आहे. ५० केंद्रांचे नियाजन असून दोन दिवसांत ३७ केंद्रांवर ही सेवा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आठवडाभरात निर्यातभवन येथे जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही.

-अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका