४५ कोटींची दावा रक्कम भरण्यास सभेत मंजुरी

नवी मुंबई प्रतिभा इंडस्ट्रीजने थकबाकीसाठी पालिकेला न्यायालयात खेचले असून न्यायालयाने आदेशित केलेल्या रकमेनुसार पालिकेला खर्च भरण्यासाठी सांगितले आहे. ती वेळीच न भरल्यास जुनी व महापालिका मुख्य इमारतीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. ही जप्तीची कारवाई टाळण्यासाठी ४५ कोटींची रक्कम देण्याचा प्रस्ताव मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र या वेळी प्रशासन पालिकेची न्यायालयीन बाजू मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

प्रतिभा इंडस्ट्रीज यांनी २१० कोटींचे कळंबोली ते दिघापर्यंतची मुख्य वितरणवाहिनी टाकण्याचे काम घेतले होते. या कामाचे ठेकेदाराचे मूळ २६ कोटी थकले होते. त्यावर व्याज लावून ७ कोटींची वाढ करून ३३ कोटी तसेच भविष्यातील खर्च गृहीत धरून ४५ कोटींचा दावा ठेकेदाराने लवादामार्फत न्यायालयात केला होता. यावर न्यायालयाने ४५ कोटींची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेशित केले होते. रक्कम न जमा केल्यास पालिकेची जुनी व नवी इमारती जप्तीचा इशाराही दिला होता.

त्यामुळे ही जप्ती टाळण्यासाठी ४५ कोटी रक्कम देण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. यावर चर्चा करताना नगरसेवक शिवराम पाटील यांनी या ठेकेदाराने केलेल्या कामाचे ऑडिट करावे अशी मागणी करीत त्याने केलेला दावा ही पालिकेवर नामुष्की ओढवण्यासारखे आहे, असे मत व्यक्त केले. जुनी व नवी इमारत ही जवळजवळ ३०० कोटींची मालमत्ता असून ४५ कोटींकरिता त्यावर जप्तीची मागणी करणे लज्जास्पद आहे. तसेच सभागृह नेता रवींद्र इथापे यांनी या संपूर्ण प्रकरणाची

चौकशी करावी याची मागणी केली. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.