डिझेल दरवाढीच्या पाश्र्वभूमीवर शक्यता; महिन्याला सव्वातीन कोटी रुपयांचा तोटा

नवी मुंबई : नुकत्याच झालेल्या डिझेल दरवाढीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महानगैरपालिकेच्या परिवहन सेवेची (एनएमएमटी) तिकीट दरवाढ अटळ असल्याचे समजते. एनएमएमटीने चार महिन्यांपूर्वी १२ किलोमीटरपेक्षा दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तिकीट दरात एक रुपयाची वाढ केली होती, मात्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला त्या दरवाढीची झळ बसली नव्हती. एनएमएमटीच्या पहिल्या टप्प्यासाठी असणाऱ्या तिकीट दरात शेअर रिक्षासारखी खासगी प्रवासी वाहतूकही होत असल्याने एनएमएमटी प्रशासन या दरवाढीसंर्दभात संभ्रमात आहे.

देशात बंगळुरु येथील परिवहन सेवेव्यतिरिक्त कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा फायद्यात नाही. नवी मुंबईच्या जवळपासच्या पालिकांतील बेस्ट, एसटी, पीएमटी, टीएमटी या शहरी परिवहन सेवांचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबईतील एनएमएमटी सेवाही याच रांगेत आहे. सार्वजनिक सेवा असल्याने या उपक्रमाची दरवाढ करताना मोठय़ा प्रमाणात विरोध होतो. तरीही एनएमएमटीने चार महिन्यांपूर्वी १२ किलोमीटरपेक्षा दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक ते दोन रुपये दरवाढ केली. याच वेळी वातानुकूलित बसच्या तिकिटात २५ टक्के कपात करून मुंबईच्या दिशेचा थंडगार प्रवास स्वस्त करण्यात आला. वातानुकूलित बसचे तिकीट कमी करण्याची ही पाहिलीच वेळ होती.

दरवाढ करण्यासाठीही नवी मुंबई परिवहन उपक्रमाला बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. काही दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाल्याने एनएमएमटीचा तोटा वाढू लागला आहे. उपक्रमात विविध मार्गावर धावणाऱ्या ३९० बसेस आहेत.

एनएमएमटीच्या अनेक बस नवी मुंबई वगळता मुंबई, पनवेल, ठाणे, उरण, कल्याण आणि डोंबिवली या आजूबाजूच्या शहरांना सेवा देतात. या ठिकाणांहून नवी मुंबईत कामानिमित्त येणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ही सेवा देणे एनएमएमटीला आवश्यक आहे. यासाठी सुमारे २५ ते २६ हजार लिटर डिझेल दिवसाला लागते.

एनएमएमटीला सध्या डिझेल ७० रुपयांत मिळत आहे. दरवाढीमुळे हा खर्च साडेचार लाख रुपयांनी वाढल्याने तोटय़ात भर पडली आहे. वेळोवेळी वाढलेल्या डिझेलच्या किमती, महागलेले वाहनांचे सुटे भाग, कर्मचारी अधिकाऱ्यांचे वेतन, सुविधा, यामुळे महिन्याकाठी उपक्रमाला सव्वातीन कोटी रुपयांचा फटका बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे हा तोटा साडेतीन कोटींच्या घरात जाऊ लागला आहे. त्यामुळे खर्च भागवून उपक्रम चालवायचा कसा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

एनएमएमटीचे पहिल्या दोन किलोमीटरचे तिकीट सात रुपये आहे. हा कमीत कमी तिकीट दर असून जास्तीत जास्त दर ४१ रुपये आहे. पहिल्या टप्प्यासाठी एनएमएमटी जो तिकीट दर आकारते तेवढय़ाच दरात शेअर रिक्षा झटपट सेवा देते. या टप्प्याच्या तिकीट दरात वाढ केल्यास अनेक प्रवासी गमावावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या टप्प्यातील तिकीट दरात वाढ करण्याचा विचार केला गेला नव्हता, मात्र बेस्ट याच अंतरासाठी आठ ते दहा रुपये आकारत आहे. किमान तो दर तरी आकरण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे.

त्यानंतर पुढे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातही पुन्हा हात घातला जाण्याची शक्यता आहे. त्यालाही ओला, उबरसारख्या खासगी वाहनांचा फटका बसू लागला असून सार्वजनिक परिवहन सेवेतील १५-२० टक्के प्रवासी कमी झाले आहेत. नवी मुंबईतून मुंबईत या खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात या सेवांनीही ‘शेअिरग’ सेवा उपलब्ध करून दिल्याने हा तोटा दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

२० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एनएमएमएमटीतील जुन्या बस आता शरपंजरी पडल्या आहेत. त्यांच्या डागडुजीवर बराच खर्च होत आहे. सर्वच बाजूंनी कचाटय़ात सापडलेल्या एनएमएमटीला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी वाशी, बेलापूर, ऐरोली येथील बस डेपोंचा व्यापारी संकुलांच्या दृष्टीने विचार केला जात आहे. त्यासाठी वाशीतील बसडेपोचा विकास करण्याचा प्रस्ताव निविदा प्रक्रियेपर्यंत आला आहे. या व्यापारी संकुलाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास प्रवाशांवर दरवर्षी असणारी तिकीट दरवाढीची टांगती तलवार हटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिझेल दरवाढीचा सर्वाधिक फटका हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला होतो. राज्यातील अनेक पालिकांच्या परिवहन सेवांत तिकीट दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. एनएमएमटीचा तोटा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. दरवाढीचा निर्णय पालिका आयुक्त घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केली जाईल. 

– शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, एनएमएमटी