अतिदक्षता, जीवरक्षक प्रणालीच्या रुग्णशय्या अपुऱ्या; पालिकेची कसरत, रुग्णांची धावाधाव

नवी मुंबई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमालीचा वाढला असून करोनाबाधितांवरील उपचारासाठी खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यातही गंभीर अवस्थेतील रुग्णांकरिता आवश्यक अतिदक्षता तसेच जीवरक्षक प्रणालीने सज्ज खाटांचा तुटवडा सर्वाधिक भासू लागला आहे. पालिकेने या खाटांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरी, त्याचे परिणाम दिसेपर्यंत दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी जाणार असल्याने तोपर्यंत नवी मुंबईत खाटांचा खडखडाट पाहायला मिळणार आहे.

नवी मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून करोनाची संख्या अतिशय वेगाने पसरत आहे. जानेवारीपासून शहरात दररोजचे नवे रुग्ण कमी व्हायला लागले होते. परंतु १५ फेब्रुवारीपासून पुन्हा करोनाने नव्याने उसळी घेतल्याने स्थिती बिकट झाली आहे. दररोजचे नवे रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, अशा सर्वच प्रकारात करोनाने सर्वोच्च संख्या गाठली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनावरही प्रचंड ताण असून शहरातील, आजी माजी लोकप्रतिनिधी, तसेच शासन दरबारातल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सामान्य नागरिकांचीही खाटांसाठी पालिकेकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तसेच पालिकेच्या आरोग्यसुविधेसह खाजगी रुग्णालयातही सातत्याने संपर्क केल्यानंतरही अतिदक्षता खाटा व जीवरक्षक प्रणाली खाटांसाठी अनेक रुग्णालयात नकारच पदरी पडत असल्याने नागरिकांमध्येही प्रचंड अस्वस्थता निर्माण होऊ  लागली आहे. शहरातील पालिकेने शहरातील बंद केलेली  सर्वच करोना काळजी केंद्र पुन्हा सुरू केली असून रुग्णांची परफट अतिदक्षता व जीवरक्षक खाटांसाठी सुरू आहे. पालिकेच्या पोर्टलवर काही खाटा उपलब्ध दिसतात, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी खाटाच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. कारण खाटांची स्थिती प्रत्येक मिनिटाला बदलत असून पालिका शहरात मोठ्या प्रमाणात अतिदक्षता खाटा व जीवरक्षक प्रणाली खाटा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नाशील आहे. अतिदक्षता व जीवरक्षक खाटांची संख्या ७००पेक्षा अधिक करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू असून शुक्रवारपासून कामोठे एमजीएम येथे ४० अतिदक्षता खाटा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. पालिकेच्या वाशी येथील कोविड काळजी केंद्रातही ७५ अतिदक्षता खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, यासाठी वेळ लागणार आहे.

रुग्णवाहिकांवर ताण

नवी मुंबई शहरात महापालिकेच्या २४ रुग्णवाहिका तसेच पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या ४५ रुग्णवाहिकेत रूपांतर केलेल्या बस अशा एकूण ६९ रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. परंतु रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे या रुग्णवाहिकाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत.