News Flash

मुदतवाढ नको, आता सिडको घरांचा ताबा द्या!

सिडकोने २०१८ मध्ये घरांचे स्वप्न दाखवत १४ हजार ८०० सोडत काढली होती..

२०१८ च्या सोडतीतील लाभार्थ्यांच्या संतप्त भावना; गेली सहा महिने बँकेचा हप्ता व घरभाडे भरत असल्याने त्रस्त

नवी मुंबई : घरांचा ताबा देण्यासाठी ऑक्टोबर, डिसेंबर, मार्च अशी तीन वेळा मुदतवाढ दिली. आता चौथी मुदतवाढ. आम्ही घराचे स्वप्न पाहिले म्हणून शिक्षा मिळत आहे का? असा संतप्त सवाल करीत आता मुदतवाढ नको घरांचा ताबा द्या, अशी मागणी सिडकोच्या २०१८ च्या सोडतीतील लाभार्थी करीत आहेत. सुमारे पाच हजार लाभार्थी घरांचा ताबा मिळत नसल्याने बँकेचा हप्ता व घरभाडे भरत असल्याने त्रस्त आहेत.

सिडकोने दोन दिवसांपूर्वी महागृहनिर्मितीत गेल्या दोन वर्षात लाभार्थी ठरलेल्या ग्राहकांना थकीत हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ दिली असून एकही हप्ता न भरणाऱ्या ग्राहकांनाही ही मुदतवाढ मिळणार आहे. याचबरोबर गेल्या वर्षी मार्चपासून जुलैपर्यंत ग्राहकांना लागू करण्यात आलेला विलंब आकार देखील माफ करण्यात आला आहे. ही मुदतवाढ जुलै २०२१ पर्यंत आहे. एकीकडे सिडकोने थकीत हप्ते असणाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी गेले वर्षभर सिडकोच्या घरांचा हप्ता व घरभाडे अशा दुहेरी संकटातून जात असलेल्या सिडको लाभार्थ्यांचे संकट मात्र अधिक गडद केले आहे. त्यामुळे हे लाभार्थी आता संतप्त झाले आहेत.

सिडकोने २०१८ मध्ये घरांचे स्वप्न दाखवत १४ हजार ८०० सोडत काढली होती. यात कागदपत्रांअभावी ६ हजार घरे बाद झाली होती. ८ हजार ८०० घरांची प्रक्रिया सुरू होती. या लाभार्थ्यांना सिडको ऑक्टोबर २०१९ मध्ये घरांचा ताबा देणार होती. मात्र काम पूर्ण न झाल्याने सिडकोने दोन वेळा मुदतवाढ दिली. त्यानंतर मार्च २०२० मध्ये करोनाचे संकट ओढवले. त्यानंतर टाळेबंदी लागू झाली. देशात टाळेबंदी असतानाही सिडकोने दिलेल्या वेळापत्रकानुसार लाभार्थ्यांकडून हप्ते वसुली सुरूच ठेवली. प्रसंगी दंड आकारत सिडकोने वसुली केली. स्वप्न पाहिलेले घर ताब्यातून जाऊ नये म्हणून करोना काळातही लाभार्थ्यांपैकी कोणी बँकांकडून कर्ज घेतले तर कुणी दागदागिने विकून, तर कुणी उसनवारीने पैसे घेत सिडकोचे हप्ते भरले. सुमारे ५ हजार लाभार्थी असे आहेत की त्यांनी सिडकोचे सर्व हप्ते भरले आहेत. हे लाभार्थी गेल्या सहा महिन्यांपासून बँकेचा हप्ता, राहत्या घराचे भाडे भरत आहेत.

गेले एक वर्ष आम्ही घरांचा हप्ता भरत आहोत. राहत्या घराचे भाडेही द्यावे लागत आहे. करोनामुळे उद्यागधंदे बंद आहेत. त्यात सिडको ताबा देत नाही. आम्ही जगायचे कसे? सिडकोने आमचे बँकेचे हप्ते भारावेत नाही तर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत. मला अठरा हजारांचा बँकेचा हप्ता आहे व दहा हजार राहत्या घराचे भाडे आहे. मी एका खासगी कंपनीत काम करतो. ३० हजार पगार असून तोही करोनामुळे पूर्ण मिळत नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत मी कसे जगायचे, असा सवाल सिडको लाभार्थी बी.व्ही. देशमुख यांनी केला आहे.   एकही हप्ता न भरणाऱ्या किंवा काही हप्ते भरण्याचे शिल्लक असलेल्या ग्राहकांना दिलासा देताना सिडको संपूर्ण हप्ते भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय करीत आहे अशी भावना या ग्राहकांनी व्यक्त केली आहे.

कोविड १९ मुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या या अडचणीचा सहानभूतीपूर्वक विचार करून एकही हप्ता न भरणाऱ्या तसेच थकबाकीदारांना आता जुलैअखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. या सर्व घरांचा ताबा लवकरात लवकर देण्याचा सिडको प्रयत्ना करीत आहे. – डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापैकीय संचालक, सिडको

सिडकोच्या २०१८च्या सोडतीत मला घर मिळाले आहे. ऑक्टोबर २०२० पर्यंत ताबा मिळणार होता म्हणून मी कर्ज घेऊन सर्व रक्कम भरलेली आहे. गेले एक वर्ष बँकेचे हप्ते व घरभाडे असे दुहेरी आर्थिक संकट सोसत आहोत. अशा वेळी सिडकोने घराचा ताबा किंवा बँकेचे हप्ते भरावेत. – अक्षय देठे, ग्राहक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2021 12:09 am

Web Title: no extension now take possession of cidco houses akp 94
Next Stories
1 जुलैपर्यंत शहरातील सर्व ज्येष्ठांना किमान एक मात्रा!
2 रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्याची जबाबदारी कोविड रुग्णालयांचीच
3 पनवेलमध्ये २०६३ करोनाबळींवर अंत्यसंस्कार
Just Now!
X