सामाजिक क्षेत्रातून नाराजीचा सूर; शासनाच्या निर्देशानुसारच सभा घेतल्याचा पालिकेचा दावा

पनवेल : पनवेल पालिकेची मंगळवारी सर्वसाधारण सभा झाली. करोनामुळे ही सभा ऑनलाइन व्यासपीठावर घेण्यात आली. मात्र आता या ऑनलाइन सभेवर आक्षेप घेतला जात आहे. पालकमंत्री पक्षबांधणीसाठी सभा घेऊ  शकतात, तर पनवेलकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेने नियम पाळून  सभा का घेतली नाही, असा प्रश्न सामाजिक संस्थांकडून विचारला जात आहे.

मंगळवारी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी परवानगी न घेता उपस्थित राहिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. याची दखल घेत अनेक सामाजिक कार्यकत्र्यांनीही खंत व्यक्त केली आहे.  पाचशेहून अधिक आसनव्यवस्था असलेल्या नाट्यगृहामध्ये सामाजिक अंतर पाळून सर्वसाधारण सभा आयोजित केली जाऊ  शकते, मात्र तसे न केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य अरविंद म्हात्रे हे वारंवार सभागृहात मंगळवारी मी पुरावे घेऊन आलो आहे, मला थेट पीठासीन पदाधिकाऱ्यासमोर बोलण्याची संधी मिळावी अशी मागणी करीत होते, परंतु ऑनलाइन सभेचे कारण पुढे रेटत ही सभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर सदस्य म्हात्रे यांना बाहेर जाण्याची सूचना करण्यात आली होती.

लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सर्वसाधारणसभेचे व्यासपीठ आहे. सामाजिक अंतर व करोना काळातील नियम पाळूनच या सभा होणे गरजेचे आहे. सदस्य म्हात्रे यांना काही पुरावे सादर करायचे होते. त्यासाठी ते अनुमती मागत होते होते, मात्र याला विरोध होणे चुकीचे आहे. नियम सर्वांसाठी सारखेच असले पाहिजेत. सर्वसाधारण सभा सामाजिक अंतर पाळून झाल्यास लोकहिताचे होईल, असे खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते  शाम फडणीस यांनी सांगितले. सामाजिक अंतर पाळून सर्वसामान्य हितांसाठी पालिकेची सभा झालीच पाहिजे. कधीपर्यंत हे सर्व बंद पाळणार. लस येण्यास अजून किती उशीर लागेल सांगू शकत नाही. त्यामुळे सदस्यांनी नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यावर चर्चा केलीच पाहिजे, असे सिटिझन युनिटी फोरमचे मनोहर लिमये यांनी सांगितले.

जनतेच्या हिताचे काही मुद्दे मला सभागृहात मांडायचे होते. आवाज स्पष्ट येत नसल्याने मला समोर येऊन बोलण्याची परवानगी मागितली होती; परंतु महापौरांनी ती फेटाळली. सभागृहात सभागृह नेते तसेच सभापती  उपस्थित होते. त्यांना परवानगी होती का? माझा आवाज बंद करण्यासाठी मला सभेमधून बाहेर जाण्यास सांगितले. – अरविंद म्हात्रे, सदस्य, पनवेल पालिका

शासनाचे सर्वसाधारण सभा घेण्याबाबत निर्देश असल्याने पनवेल पालिकेची सभा थेट घेऊ  शकत नाही. शासनाचे आदेश आल्यावर नक्कीच थेट सभा सामाजिक अंतर पाळून घेण्याचे निर्देश देऊ. करोना संसर्ग काळात मोर्चे, सभा यासाठी पालिकेने कुठेही परवानगी दिलेली नाही.– सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका