करंजा बंदराचे भूमिपूजन

उरण : जेएनपीटी परिसरात उभारण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) सवा लाख रोजगार निर्माण होणार असून त्याचा लाभ कोकणातील तरुणांना होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.

उरणच्या करंजा बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गडकरी म्हणाले, प्रवासी जलवाहतुकीला प्राधान्य देऊन इंधनाचे दर कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्रवास स्वस्त आणि जलद होऊ शकेल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील बहुतेक देशांचा विकास सागराच्या आणि सामरिक शक्तीवर झाला आहे. या शक्तीची ओळख पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना झाली होती. त्यांच्याच मार्गाने केंद्र सरकार ‘सागरमाला’ आणि ‘नीलक्रांती’च्या माध्यमातून सागरी अर्थव्यवस्था बळकट करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून करंजा मत्स्यव्यवसाय बंदराचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबईच्या ससून डॉक या १८७१ मध्ये ब्रिटिशकालीन मत्स्यव्यवसाय बंदरावरील वाढता भार कमी करण्यासाठी करंजा मत्स्यव्यवसाय बंदराची उभारणी केली जाणार आहे. या बंदरात एक हजार मच्छीमार बोटींची मासळी उतरण्यात येईल. त्याचप्रमाणे या परिसरात मासळीवर प्रक्रिया करणारे प्रकल्पही उभारले जातील. त्यामुळे रोजगारनिर्मितीही होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘मत्स्यव्यवसाय १० हजार कोटींवर नेणार’

इंटिग्रेटेड फिशिंग हब उभारून निर्यातीची क्षमता वाढविण्यास प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. सहा हजार कोटींचा मत्स्यव्यवसाय १० हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) दरम्यानची ‘रो रो सेवा’ लवकरच सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर करंजा येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.