पनवेल शहरामधील नागरिकांना यंदा डिसेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पुढील काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आठवडय़ातील एक दिवस शहरातील एका भागात पाणीपुरवठा बंद राहील .

पनवेल शहराला सुमारे ३० एमएलडी पाणी केवळ पनवेल शहराला लागणार आहे. त्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ४ ते पाच एमएलडी आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून सहा एमएलडी पाणीपुरवठा शहराला केला जातो. देहरंग धरणात दीड हजार दशलक्ष लिटर पाणी आहे. मागील वर्षी उन्हाळ्यात पनवेलमध्ये तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता.

शहरातील प्रत्येक क्षेत्रात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा होणार नाही यासाठी शहरात रिक्षातून भोंग्याने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहर हे पाण्यामध्ये समृद्ध होईल अशी अपेक्षा होती. मात्र मागील तीन वर्षांत याबाबत कोणतीही ठोस पावले राज्य पातळीवर सरकाने गतिमान पद्धतीने उचलली गेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

सध्या देहरंग धरणातून १८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. आठवडय़ातील एक दिवस एका परिसरात पाणीपुरवठा न झाल्यास आठ एमएलडी पाण्याची बचत होऊ शकेल. ‘कल्पतरू’ या सर्वाधिक घरे असणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीला थेट जीवन प्राधिकरणाद्वारे नळाद्वारे पाणीपुरवठा थेट होतो. एमजेपी दुरुस्तीच्या कामासाठी बंद पाळेल त्याचवेळी कल्पतरू सोसायटीमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. कल्पतरू या गृहसंस्थेत सामान्यांसह राजकीय बडय़ा नेत्यांची घरे आहेत. पालिकेने जीवन प्राधिकरणाकडे वाढीव पाणीपुरवठय़ाची मागणी केली आहे.

आठवडय़ातील एक दिवस वगळता इतर दिवस व्यवस्थित पाणीपुरवठा होईल. उन्हाळ्यात कपातीची कमी झळ बसावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. पालिकेच्या संकेतस्थळावर कोणत्या परिसरात कधी कपात केली जाईल, याची माहिती उपलब्ध आहे. – उल्हास वाड, जल अभियंता, पनवेल पालिका